१. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना झालेल्या त्रासाचे स्वरूप
‘वर्ष २०२१ मध्ये कोरोनाच्या काळात सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५४ वर्षे) देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहाण्यासाठी आल्या होत्या. दोघींनाही पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक त्रास होत होते. त्यामुळे त्यांचे शारीरिक क्लेशही वाढलेले होते. त्यांना स्नान करतांना आणि प्रसाद, महाप्रसाद घेतांनाही त्रास होत होता. सद्गुरु राजेंद्र शिंदे त्या दोघींसाठी देवद आश्रमातील संतांना नामजपादी उपाय करायला सांगत असत. त्या वेळी सद्गुरु राजेंद्रदादा आम्हाला त्या दोघींसाठी कधीही नामजपादी उपाय करायला सांगत असत.
एकदा सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा त्रास इतका वाढला की, त्यांना बसणे, उठणे आणि बोलणे, हे करता येत नव्हते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही ४ संतांनी तातडीने सद्गुरु अनुताईंसाठी नामजप करायला आरंभ केला.
२. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्यासाठी नामजप करतांना पू. गुरुनाथ दाभोलकर यांना झालेले त्रास
मी नामजप चालू करून ३ – ४ मिनिटे होताच मला अस्वस्थ वाटू लागले. मी बसून नामजप करत असतांना माझी पाठ दुखू लागली. मी खोलीत चालत नामजप करू लागल्यावर माझी कंबर, गुडघे आणि पाय दुखू लागले, तरीही मी पुष्कळ प्रयत्न करून नामजप करत होतो. त्या वेळी माझ्या दृष्टीसमोर सद्गुरु अनुताईंचा वेदनामय चेहरा सारखा दिसत होता. नंतर १० ते १२ मिनिटांतच मला दुखण्याने घेरले. मला वेदना सहन होत नव्हत्या. मला नामजप करणे अशक्य झाले. मला एक पाऊलही टाकणे कठीण झाले. काही सेकंदांतच झोपेने माझ्यावर ताबा मिळवला.
३. काही वेळाने मला जाग आल्यावर मी सद्गुरु राजेंद्रदादांना माझी स्थिती कळवली. तेव्हा मला समजले, ‘२ संतांचा नामजप पूर्ण झाला होता आणि सद्गुरु अनुताईंना थोडे बरे वाटू लागले होते.’
मी मात्र त्या दिवशी सद्गुरु अनुताईंसाठी जप करण्यास अपयशी ठरलो. मी देवाजवळ कान पकडून क्षमा मागितली. आजपर्यंत मी अनेक जणांसाठी नामजप केले; मात्र मला असा त्रास कधीच झाला नाही. आजही तो प्रसंग आठवला, तरी माझे मन उद्वीग्न होते.’
– (पू.) श्री. गुरुनाथ दाभोलकर (सनातनचे ४० वे संत, वय ८४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.३.२०२१)
|