कोल्हापूर – वर्ष १८५७ मध्ये स्वतंत्र होण्यासाठी अखंड भारत लढत होता; परंतु त्यानंतर इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’, या नीतीने एकसंघ असणार्या भारत देशाला फाळणीपर्यंत नेऊन ठेवले. याचाच परिपाक म्हणून वर्ष १९४७ मध्ये अगदी ४ घंट्यांमध्ये देशाची फाळणी केली. फाळणीच्या काळात पाकिस्तानमधून येणार्या निर्वासित हिंदूंवर अत्याचार झाले. पुढील ७० वर्षांत काँग्रेसने हा इतिहास अगदी बेमालूमपणे लपवला. त्यासाठीच भाजपच्या वतीने गेल्या ६ वर्षांपासून ‘विभाजन विभिषिका’ हा दिवस पाळला जातो आणि नवीन पिढीला या फाळणीच्या संदर्भात विस्तृत माहिती दिली जाते. अखंड भारताचे स्वप्न पहाण्यासाठी पुन्हा एकदा नव्या ऊर्जेने सिद्ध होण्यासाठी समाजामध्ये संम्मिलीत व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर, सांगली आणि सातारा विभाग प्रचारप्रमुख विवेक मंद्रूपकर यांनी या वेळी केले.
भाजप जिल्हा कार्यालयात ‘विभाजन विभिषिका’ अर्थात् ‘फाळणी दिवस’ नुकताच पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, सरचिटणीस गायत्री राऊत, डॉ. सदानंद राजवर्धन यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.