देहली – आपण वर्ष १९५० मध्ये राज्यघटना स्वीकारली. शेजारी देशात स्वातंत्र्य अनिश्चित असल्याचा परिणाम काय होतो ?, हे आपण बांगलादेशाच्या उदाहरणातून पाहू शकतो. यातून स्वातंत्र्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. स्वातंत्र्याला गृहीत धरणे पुष्कळ सोपे असते; परंतु या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात, हे भूतकाळातील प्रसंगांवरून ओळखले पाहिजे, असे विधान भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त राजधानीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात देशाला कशाला सामोरे जावे लागले ?, त्या वेळची राज्यघटना आणि कायदा यांची स्थिती काय होती ?, हे सर्वांना ठाऊक आहेच. कायद्याचा व्यवसाय सोडून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांप्रती आपण आदर राखला पाहिजे.