आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद ११ ऑगस्टपर्यंत देणार निर्णय !
पॅरिस (फ्रान्स) – ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताच्या महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती; परंतु अंतिम फेरीच्या सामन्याआधी केलेल्या वजनात त्यांचे वजन ५० किलो १०० ग्रॅम इतके होते. त्यामुळे त्यांना अंतिम सामन्यात खेळण्यासाठी अपात्र ठरवण्यात आले. यावरून त्यांना किमान रौप्यपदक तर दिले जावे, यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद म्हणजेच ‘कोर्ट ऑफ आरबिट्रेशन फॉर स्पोर्ट’कडे दाद मागितली आहे.
‘ऑलिंपिक स्पर्धा संपायच्या आत, म्हणजे ११ ऑगस्टपर्यंत हा निकाल दिला जाईल’, असे लवादाने स्पष्ट केले आहे. अशातच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक महासंघाने या प्रकरणावर महत्त्वपूपर्ण वक्तव्य केले आहे.
महासंघाचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी म्हटले की, जर तुम्ही मला सामान्य परिस्थितीत एकाच गटात दोन रौप्य पदके देणे शक्य आहे का ?, असे विचारत असाल, तर माझे उत्तर ‘नाही’ असे आहे. आम्हाला आंतरराष्ट्रीय फेडरेशनने ठरवून दिलेले नियम पाळावे लागतात. आंतरराष्ट्रीय फेडरेशन आणि ‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंग’ या संस्था निर्णय घेतात, असेही बाक यांनी स्पष्ट केले. ते एका पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. फोगाट अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरल्यानंतर तिसर्या स्थानावर असलेल्या कुस्तीपटूला अंतिम सामना खेळण्यासाठी बोलावण्यात आले होते.
बाक पुढे म्हणाले की, अशा प्रकरणाचा विचार करता एक गोष्ट ठरवावी लागते. ती अशी की, तुम्ही कुठला बिंदू शेवटचा मानाल ? १०० ग्रॅम अधिक वजनाला अंतिम बिंदू मानला, तर आम्ही पदक द्यायला हवे, पण मग १०२ ग्रॅम असेल, तर आम्ही द्यायला नको असे तुमचे म्हणणे आहे का ? शेवटी लवाद जो निर्णय घेईल, तो आम्ही मान्य करू. असे असले, तरी युनायटेड ‘वर्ल्ड रेसलिंग संस्थे’चे मतही विचारात घ्यावे लागेल.