हिंदु जनजागृती समितीचे तहसीलदारांना निवेदन
कोल्हापूर, ८ ऑगस्ट (वार्ता.) – बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिंसक वळण घेतले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे आदी अत्याचार केले जात आहेत. तरी बांगलादेशातील हिंदूंवरील वाढती आक्रमणे लक्षात घेता तेथील हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवा, या मागणीचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार स्वप्नील पवार यांना देण्यात आले.
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, श्री. अर्जुन आंबी, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, ‘महाराज प्रतिष्ठान’चे संस्थापक-अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे आणि श्री. विकास जाधव, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, हिंदु एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, प्रीतम पवार, बाबासाहेब भोपळे, दीपक कातवरे उपस्थित होते.
या वेळी करण्यात आलेल्या काही मागण्या
१. प्रथम बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे, घरांची लूट, मंदिरांवरील आक्रमणे, मूर्तींची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सूचना द्याव्यात.
२. आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित अथवा मालमत्ता यांची जी हानी झाली असेल, त्याची तातडीने भरपाई करावी.
३. भारत सरकारने हा विषय तातडीने ‘संयुक्त राष्ट्र संघा’त मांडून बांगलादेशामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी करावी.
४. बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील जे हिंदु विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील, त्यांना ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’द्वारे (सीएए) भारत सरकारने आश्रय द्यावा.
५. तसेच यापूर्वीही जवळपास ५ कोटी बांगलादेशी घुसखोर भारतात शिरले आहेत, या घटनेनंतर पुन्हा ही घुसखोरी वाढण्याची शक्यता पहाता भारतीय सीमेवर चोख बंदोबस्त करावा.