Bangladesh Next Pakistan : बांगलादेशातील घटनांमागे पाकिस्‍तान आणि अमेरिका ! – सजीब वाजेद जॉय

  • शेख हसीना यांचा अमेरिकेत असणारे पुत्र सजीब वाजेद जॉय यांचे गंभीर विधान !

  • चीनचा कोणताही हात नाही !

  • बांगलादेश आता पाकिस्‍तान होणार, अससल्‍याचा केला दावा  !

  • शेख हसीना पुन्‍हा बांगलादेशात परतणार नसल्‍याचेही केले स्‍पष्‍ट  !

सजीब वाजेद जॉय

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – बांगलादेशातील घटनांमागे पाकिस्‍तान आणि अमेरिका आहे, असा आरोप बांगलादेशाच्‍या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे अमेरिकेत वास्‍तव्‍य करणारे पुत्र सजीब वाजेद जॉय यांनी भारतातील काही वृत्तवाहिन्‍यांना दिलेल्‍या मुलाखतीत केला आहे. याच वेळी त्‍यांनी ‘चीनने देशाच्‍या कारभारात कधीच हस्‍तक्षेप केलेला नाही. त्‍याचा यात हात नाही’, हेही स्‍पष्‍ट केले. ‘बांगलादेश आता पाकिस्‍तान होणार’, असा दावाही त्‍यांनी या वेळी केला. तसेच ‘शेख हसीना पुन्‍हा बांगलादेशात परतणार नाहीत. त्‍या अमेरिकेत रहातील’, असेही त्‍यांनी सांगितले. हसीना यांनी ब्रिटनकडे राजनैतिक आश्रय मागितल्‍याचे वृत्त होते. ते जॉय यांनी फेटाळले आहे. पाकिस्‍तानची गुप्‍तचर संस्‍था आय.एस्.आय.ने बांगलादेशातील विद्यार्थी संघटनांना शेख हसीना यांच्‍या विरोधात चिथावल्‍याची माहितीही समोर आली आहे. ‘गेल्‍या काही मासांपासून पाकिस्‍तानकडून हे षड्‍यंत्र रचले जात होते. अमेरिकेलाही बांगलादेशात अस्‍थिर सरकार हवे होते’, असेही ते म्‍हणाले.

सजीव जॉय यांनी पुढे सांगितले की,

शेख हसीना हताश आणि निराश

माझ्‍या आईला बांगलादेश सोडायचा नव्‍हता; परंतु तिची सुरक्षा पहाता आम्‍ही तिला समजावले. तिने बांगलादेशाला स्‍थिर आणि चांगले सरकार दिले होते. बांगलादेशाला विकासाच्‍या मार्गावर नेले होते. आतंकवादाचा सामना केला होता. बांगलादेशाच्‍या सध्‍याच्‍या परिस्‍थितीवर ती हताश आणि निराश आहे.

‘जमात-ए-इस्‍लामी’ची मुख्‍य भूमिका

देशातील परिस्‍थिती नियंत्रणात आणण्‍यासाठी सैन्‍याची शक्‍ती वापरणे आवश्‍यक झाले होते; मात्र विद्यार्थ्‍यांच्‍या विरोधात सैन्‍याचे बळ वापरण्‍यास हसीना यांनी विरोध केला. यामुळे त्‍यांनी त्‍यागपत्र देणे योग्‍य समजले. या सर्व घटनाक्रमात ‘जमात-ए-इस्‍लामी’ची भूमिका आहे. यामध्‍ये सामान्‍य बांगलादेशी मुळीच सहभागी नाहीत.

बांगलादेशाच्‍या भविष्‍याचे दायित्‍व आमचे राहिलेले नाही

आम्‍ही आमच्‍या नेत्‍यांचे संरक्षण नक्‍कीच करू. वर्ष १९७५ मध्‍येही पक्षाच्‍या नेत्‍यांची हत्‍या झाली होती. आम्‍हाला तशीच परिस्‍थिती पुन्‍हा नको होती; परंतु आता बांगलादेशाच्‍या भविष्‍याचे दायित्‍व आमचे राहिलेले नाही. बांगलादेशाला वाचवण्‍यासाठी खूप प्रयत्न केले; परंतु आता हसीना लोकांना वाचवण्‍यासाठी परत येणार नाहीत. त्‍या ७७ वर्षांच्‍या आहेत. त्‍यांचा राजकारणातील हा शेवटचा कार्यकाळ होता. त्‍या निवृत्त होणार होत्‍या. आम्‍ही सैन्‍यावर टीका करणार नाही. हेच त्‍यांचे नशीब आहे. आमच्‍या पक्षाच्‍या नेत्‍यांवर आक्रमणे केली जात आहेत. मला वाटत नाही की, यापुढे निष्‍पक्ष निवडणूक होईल. आमच्‍या कुटुंबाने बांगलादेशात विकास करून दाखवला आहे. जर आता बांगलादेशाचे लोक सोबत उभे रहाण्‍यास इच्‍छुक नसतील, तर लोकांना तेच नेतृत्‍व मिळेल ज्‍यासाठी ते पात्र आहेत.

शेख हसीना अद्याप भारतातच !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – बांगलादेश सोडलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देहलीजवळ असलेल्या गाझियाबादमधील भारतीय वायूदलाच्या हिंडन विमानतळावर ५ ऑगस्टच्या रात्री मुक्काम केला. ६ ऑगस्टला रात्रीपर्यंत त्या तेथेच होत्या. येथील वायूदलाच्या संरक्षणात त्यांना ठेवण्यात आले आहे. त्या कोणत्या देशात आश्रय घेणार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्या आणखी किती दिवस भारतात रहाणार आहेत, हेही स्पष्ट नाही. त्यांची मुलगी सध्या देहलीमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

महंमद युनूस बांगलादेशातील अंतरिम सरकारचे नेतृत्‍व करण्‍याची शक्‍यता

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्‍या राष्‍ट्रपतींनी संसद विसर्जित केली आहे. बांगलादेशात सैन्‍याच्‍या नेतृत्‍वाखाली अंतरिम सरकार स्‍थापन करण्‍याची सिद्धता चालू असून प्रसारमाध्‍यमांच्‍या वृत्तानुसार नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारचे नेतृत्‍व करू शकतात. महंमद युनूस यांनीही अंतरिम सरकारचे नेतृत्‍व करण्‍याचे मान्‍य केले आहे.