Proposal For Kashmiri Hindus In British Parliament : काश्मिरी हिंदूंना न्याय देण्यासाठी ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला प्रस्ताव

खासदार बॉब ब्लॅकमन

लंडन (ब्रिटन) – काश्मीर खोर्‍यात काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडाच्या ३५ व्या वर्षानिमित्त ब्रिटीश संसदेत एक ठराव मांडण्यात आला. यामध्ये काश्मिरी हिंदूंच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना न्याय मिळण्याचे सूत्र उपस्थित करण्यात आले. खासदार बॉब ब्लॅकमन यांनी संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ‘अर्ली डे मोशन’ सादर केला. काश्मिरी हिंदूंच्या वेदना आणि संघर्ष यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी, यासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. खासदार बॉब ब्लॅकमन म्हणाले की, जानेवारी १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंवरील आक्रमणांना ३५ वर्षे पूर्ण होत आहेत आणि हे सभागृह तीव्र दुःख अन् निराशा यांद्वारे  साजरे करत आहे. या हिंसाचारात हत्या झालेल्या कुटुंबांप्रती आम्ही आमच्या मनापासून सहानुभूती व्यक्त करतो.


काय म्हटले आहे ठरावात ?

या ठरावात असेही म्हटले आहे की, या हिंसाचारानंतर काश्मिरी हिंदूंना विस्थापन आणि त्रास सहन करावा लागला; परंतु त्यांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. काश्मिरी हिंदूंना लक्ष्य करून झालेल्या आतंकवादी आक्रमणांना प्रायोजित करणार्‍यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. जम्मू आणि काश्मीर येथे हिंदूंच्या सतत होणार्‍या हत्यांचा आम्ही निषेध करतो. हा ठराव आंतरराष्ट्रीय समुदायाला काश्मिरी हिंदूंच्या दुःखाची आणि त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.


१९ जानेवारी ‘महाविनाश दिवस’ !

जगभरातील काश्मिरी हिंदू १९ जानेवारी हा दिवस ‘महाविनाश दिवस’ म्हणून साजरा करतात. याच दिवशी पाकिस्तान पुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीर खोर्‍यात काश्मिरी हिंदूंवर आक्रमणे केली होती. ‘हिंदूंनी त्यांची संपत्ती आणि महिला यांना सोडून निघून जावे’, अशा धमक्या मशिदींवरील भोंग्यांवरून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे साडेचार लाख हिंदूंना पलायन करावे लागले होते.

संपादकीय भूमिका

भारताकडून अद्यापही काश्मिरी हिंदूंना न्याय मिळालेला नाही. काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात एकही गुन्हा नोंद झाला नाही आणि कुणावरही ३५ वर्षांत कारवाई झाली नाही, हे लज्जास्पद !