भाजपचे पुण्यातील बालेवाडी येथे महाअधिवेशन !
पुणे – आज हिंदू आणि शिवप्रेमी यांना ‘आतंकवादी’ म्हटले जाते. आज जागे झालो नाही, तर भविष्यात जागे होण्याची संधीही मिळणार नाही. आपल्या हिंदुत्वाविषयी अपराधबोध ठेवण्याची आवश्यकता नाही. ‘फेक नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) हा आजचा रावण आहे. त्याच्या बेंबीत बाण मारायचा आहे. ‘फेक नॅरेटिव्ह’ला ‘थेट नॅरेटिव्ह’ने उत्तर देण्याची ‘इकोसिस्टीम’ (विरोधकांना शह देण्यासाठी विविध स्तरांवर राबवलेली कार्यप्रणाली) आपण सिद्ध करत आहोत. त्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे. खोट्याला खर्याने उत्तर द्यायचे आहे. त्यासाठी आता आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि हवी तशी ‘बॅटिंग’ करा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना प्रचारासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले. पुण्यातील बालेवाडी येथे भाजपचे महाअधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, नकारात्मक बोलून निष्ठेने काम करणार्यांच्या मनात विष कालवू नका. अल्प जागा मिळाल्यावरही कोण बरोबर रहातो ? हे महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कधी एक पाऊल पुढे टाकले, तर कधी एक पाऊल मागे घेतले. कधी मान, कधी अपमान, कधी तह, तर कधी सलगी केली. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी या गोष्टी केल्या. पावणे दोन कोटी मते घेतल्याविना रहाणार नाही. मुख्यमंत्री कोण ? हा प्रश्न आता विचारू नका. मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे.
भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देण्याचे काम शरद पवार यांनी केले ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
या वेळी बोलतांना भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, शरद पवार हे भ्रष्टाचार्यांचे सरदार आहेत. ते राजकारणात सर्वांत भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राला आमच्या केंद्र सरकारने १० लाख कोटी रुपये दिले, शरद पवार सहभागी असलेले सरकार केंद्रात
१० वर्षे असतांना त्यांनी काय दिले ?
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतांना शहा म्हणाले की, ते ‘औरंगजेब फॅन क्लब’चे अध्यक्ष आहेत. हा क्लब राज्याला सुरक्षित ठेवू शकतो का ? छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या प्रकरणी विरोध करणार्यांच्या समवेत उद्धव ठाकरे बसले आहेत.
विधानसभेसाठी भाजप १५५ ते १६० जागा लढवण्याची शक्यता !
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या वेळी जागावाटपात बराच वेळ गेल्याने त्याचे दुष्परिणाम निकालावर झाले आणि ४५ जागांचे ध्येय असूनही केवळ १७ जागा मिळाल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप लवकर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. सध्याची स्थिती पहाता राज्यात स्वबळावर २८८ जागा लढवणे शक्य नाही. त्यामुळे महायुतीत राहून विधानसभा लढवण्याविषयी भाजप ठाम आहे. १५५ ते १६० जागा लढवायच्या, असा निर्णय भाजप नेत्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे शिवसेना, अजित पवार गट आणि अन्य लहान पक्षांना १२८ ते १३३ जागा मिळतील. जे आमदार ज्या पक्षातून निवडून आले आहेत, त्या जागा त्याच पक्षाला मिळतील. ‘बाकीच्या जागांचे वाटप कसे करायचे ?’ इतकाच विषय शिल्लक राहिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला जाणार नाही, असेही भाजपने स्पष्ट केल्याचे समजते. |