शासनाच्या पशूसंवर्धन विभागाची पुनर्रचना करण्याला स्थगिती ! – राधाकृष्ण विखे पाटील, पशूसंवर्धनमंत्री

पशूसंवर्धनमंत्री,राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, ९ जुलै (वार्ता.) – शासनाच्या पशूसंवर्धन विभागाची पुनर्रचना करण्याला लघु पशूवैद्यकीय व्यावसायिकांचा विरोध होत असल्याने पुनर्रचना करण्याला स्थगिती दिली आहे. आजच सर्वांसमवेत बैठक घेऊन याविषयी निर्णय घेण्यात येईल, तसेच सदस्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करण्यात येईल. मंत्रीमंडळात याविषयी आवश्यकता वाटली, तर चर्चा करू, तसेच हा प्रस्ताव रहित करण्याविषयी विचार करण्यात येईल, अशी माहिती पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ९ जुलै या दिवशी विधान परिषदेत प्रश्नोत्तरात दिली. सदस्या डॉ. श्रीमती मनीषा कायंदे यांनी हा प्रश्न विचारला होता.

सदस्या श्रीमती मनीषा कायंदे म्हणाल्या की, शासनाने १३ मार्च २०२४ या दिवशी प्रसिद्धीपत्रक काढून पशूसंवर्धन, दुग्धविकास विभागाची पुनर्रचना करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील शेतकर्‍यांना पशूसेवा देणार्‍या जवळपास १ लाख २० सहस्र लघु पशूवैद्यकीय व्यावसायिकांच्या रोजगारावर विपरित परिणाम होणार आहे. व्यावसायिकांनी विभागाच्या पुनर्रचनेस विरोध केला आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करून शासनस्तरावर कोणती कार्यवाही केली ?