काँग्रेसचे राहुल गांधी : विरोधी पक्षनेते कि अराजक प्रणेते ?

सध्या देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण वेगाने रसातळाला चालले आहे, हे लक्षण चांगले नाही. या गोष्टीचा वारंवार प्रत्यय येत आहे. देशाची प्रतिमा मलीन करणे आणि देशात यादवी निर्माण व्हावी, या हेतूने देशातील विरोधी पक्ष कार्यरत झाला आहे, याची साक्ष सोमवार, १ जुलै २०२४ या दिवशी विरोधी पक्षनेते अन् काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या संसदेतील भाषणाने दिली आहे.

संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी

१. राहुल गांधींचे संसदेतील भाषण म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या मर्यादांचे उल्लंघन !

राहुल गांधींचे संसदेतील भाषण देशात अराजक निर्माण व्हावे आणि देशातील शांतता सुव्यवस्था नष्ट व्हावी, याच हेतूने केलेले भाषण आहे. असे निश्चितपणे सांगता येते. संसदेच्या सभागृहातील त्यांचे हे भाषण, म्हणजे नाक्यावरच्या चांडाळचौकडी समोर असभ्यतेने आणि बेदरकारपणे केलेली बडबड आहे. एकंदरीत राहुल गांधींचे भाषण, त्यांची देहबोली, त्यांचे वर्तन सारेच सभागृहाची मानहानी करणारे आहे. अशा प्रकारचा विरोधी पक्षनेता जगाच्या पाठीवर कुठेही आढळणे शक्य नाही. राज्यघटनेने जरी अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिले असले, तरी त्याला काही मर्यादा आहेत. त्या सर्व मर्यादांचे राहुल गांधींनी उल्लंघन करून राज्यघटनेलाही लाथाडले आहे.

२. सैन्यदलात फूट पाडून देशात अराजक निर्माण करण्याचे राहुल गांधींचे षड्यंत्र !

श्री. दुर्गेश परुळकर

सामान्यपणे सत्ताधारी पक्षावर आरोप प्रत्यारोप करतांना विरोधी पक्षनेता अत्यंत दायित्वतेने बोलत असतो, तसेच त्यांनी केलेल्या आरोपात कसे तथ्य आहे ? ते तो आपल्याकडील माहितीचे दाखले देऊन स्वतःचे म्हणणे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. काल राहुल गांधींनी यापैकी कोणतीही गोष्ट केली नाही. राहुल गांधींनी केलेले सारे आरोप तथ्यहीन आहेत. सैन्यदलातील अग्नीविरांना (सैन्यात तरुणांना भरती करण्यासाठी चालू केलेली योजना) चिथावणी देऊन बंड करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा त्यांचा मानस त्यांच्या भाषणातून निदर्शनास येत होता. त्यांचे या विषयावरील भाषण, म्हणजे ‘सैन्यदलात फूट पाडून देशात अराजक निर्माण व्हावे’, हा आहे, हे स्पष्ट होते.

संरक्षणमंत्री राहुल गांधींच्या आरोपांचे खंडण करत असतांनाही गांधी यांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, तसेच त्याविषयी कोणतेही दाखले न देता आपलेच म्हणणे कसे खरे आहे, हे सांगण्याचा त्यांचा आततायीपणा सातत्याने चालू होता. संसदेतील सभ्यतेच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन राहुल गांधी वारंवार करत असल्याचे आढळून येत होते.

३. राहुल गांधींना हिंदू हिंसक दिसणे हा त्यांचा विकार दोष !

‘देशातील प्रत्येक हिंदू हा हिंसक आहे आणि सतत हिंसा करत असतो. असत्य कथन करत असतो’, असा भयंकर आणि तथ्यहीन आरोप हिंदु समाजावर राहुल गांधींनी केला आहे. एवढेच नव्हे, तर भगवान शंकरांची प्रतिमा संसदेत दाखवून त्यांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरही आघात केले आहेत. त्यांचे हे भाषण म्हणजे हेतूत: हिंदु समाजाला अपमानित करणे एवढेच नसून ‘हा समाज अभिव्यक्तीस्वातंत्र्याला कसा विरोध करतो आहे’, अशी ओरड करण्यासाठी राहुल गांधी पुन्हा गरळ ओकण्यास मोकळे आहेत. त्यांच्या संसदेतील भाषणामागचा हेतू देशातील वातावरण बिघडावे, हाच आहे. सध्या देशातील विविध भागांत मुसलमान समाजाकडून होत असलेला हिंसाचार राहुल गांधींना दिसत नाही. पीडित हिंदूच्या करुण किंकाळ्या त्यांच्या कानावर पडत नाहीत. त्यांच्या दृष्टीला सनदशीर मार्गाने स्वतःवरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करणारा हिंदु समाज हिंसक वाटतो. हा राहुल गांधींचा दृष्टीदोष नसून विकारदोष आहे.

४. राहुल गांधींना संसदेत बसण्याचा नैतिक अधिकार नाही !

राहुल यांच्या भाषणात देशातील विविध स्तरांतील नागरिकांवर विद्यमान सरकारकडून अन्याय होत आहे. त्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी विद्यमान सरकारवर केलेले आरोप हे तथ्यहीन आहेत. कोणताही आरोप करतांना ते आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केलेला आढळत नाही, तर ‘केलेला आरोप हा सत्य आहे, त्यासाठी पुरावे देण्याची आवश्यकता नाही’, अशी बेदरकार भाषा आणि त्यातील अविर्भाव हा त्यांच्या भाषणामागचा हेतू शुद्ध नसल्याचे स्पष्ट करतो. संबंधित खात्यातील मंत्र्यांनी दिलेले स्पष्टीकरण स्वीकारण्याचे नव्हे, तर ऐकण्याचेही सौजन्य राहुल गांधींनी दाखवलेले नाही. त्यांचे हे वर्तन म्हणजे संसदेतील कामकाज योग्य प्रकारे होऊ नये; म्हणून केलेला प्रयत्न आहे. अशा प्रकारे संसदेच्या कामकाजात व्यत्यय निर्माण करून राष्ट्राची आर्थिक हानी आणि काळाचा अपव्यय राहुल गांधी करत आहेत. अशा प्रकारे वर्तन करणार्‍या संसदेच्या सभासदाला संसदेत बसण्याचा नैतिक अधिकार नाही.

संसदेतील कामकाज सुरळीत आणि नियमावलीत दिल्याप्रमाणे पार पाडणे, हे जेवढे सत्ताधारी पक्षाचे दायित्व आहे, तेवढेच विरोधी पक्ष नेत्याचे दायित्व आहे. राहुल गांधी यांनी संसदेच्या नियमावलीचा आणि मार्गदर्शन तत्त्वांचा आदर राखला आहे, असे म्हणता येत नाही. यावरून आपल्याला असे नक्की म्हणता येते की, राहुल गांधी हे ‘विरोधी पक्षनेता’ या पदासाठी अपात्र आहेत; कारण त्यांनी देशहिताचा विचार करून केलेले भाषण नाही. त्यांचे भाषण हे एका अराजक प्रणेत्याचे आहे, हे यातून स्पष्ट होते.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२.७.२०२४)