सूक्ष्मज्ञान मिळवण्‍याची सेवा करतांना होणारे आध्‍यात्मिक त्रास आणि त्‍यावर नामजपादी उपाय केल्‍यामुळे झालेले लाभ !

‘आम्‍हा सूक्ष्मज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांना (मी, श्री. राम होनप आणि सुश्री मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) यांना) सूक्ष्मातून ज्ञान प्राप्‍त करण्‍याची सेवा करता येऊ नये’, यासाठी सूक्ष्मातील अनिष्ट शक्‍ती आमच्‍यावर विविध प्रकारे आक्रमणे करतात. या सूक्ष्मातील आक्रमणांमुळे ज्ञानप्राप्‍तीची सेवा करतांना आम्‍हाला विविध प्रकारचे आध्‍यात्मिक त्रास होतात; पण गुरुकृपा आणि संतांचे मार्गदर्शन यांमुळे आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय केल्‍यावर या त्रासांवर मात करून ज्ञानप्राप्‍तीची सेवा करता येते. या संदर्भात मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

भाग १

श्री. निषाद देशमुख

१. आध्‍यात्मिक त्रासात सुप्‍त स्‍वरूपात टप्‍प्‍याटप्‍प्‍याने वाढ होणे; म्‍हणून त्रास वाढत असतांना त्‍याच वेळी आध्‍यात्मिक उपाय केल्‍यावर त्रासांची तीव्रता न्‍यून होणे

मला लहानपणापासून आध्‍यात्मिक त्रास आहे. लहानपणापासून कधीही माझ्‍या आध्‍यात्मिक त्रासात वाढ व्‍हायची आणि कधी अकस्‍मात् त्‍यात घट व्‍हायची. मागील ३ – ४ वर्षांपासून याचा सखोल अभ्‍यास केल्‍यावर माझ्‍या लक्षात आले, ‘माझ्‍या आध्‍यात्मिक त्रासात सुप्‍त स्‍वरूपात टप्‍प्‍याटप्‍प्‍याने वाढ होते आणि मग एकदम त्‍या त्रासाचे प्रकटीकरण होते; म्‍हणून ‘त्रास वाढत असतो, त्‍याच वेळी त्‍यावर आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय केल्‍यावर तो पुढे फार त्रासदायक होत नाही.

२. ज्ञानाचे टंकलेखन किंवा सूक्ष्म परीक्षण करतांना आध्‍यात्मिक त्रासात वाढ होणे

माझा त्रास वाढण्‍याची आध्‍यात्मिक कारणे शोधतांना माझ्‍या लक्षात आले, ‘सूक्ष्मातून मिळालेल्‍या ज्ञानाचे टंकलेखन करतांना किंवा एखाद्या प्रयोगाचे, व्‍यक्‍तीचे किंवा वस्‍तूचे सूक्ष्म परीक्षण केल्‍यानंतर मला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्‍तीच्‍या प्रमाणात पुष्‍कळ वाढ होते. हे प्रमाण पुष्‍कळ वाढल्‍यावर मला ‘नीट संकलन करता न येणे, ज्ञानाचा विषय व्‍यवस्‍थित न सुचणे, चुकीचे ज्ञान मिळणे किंवा चुकीचे सूक्ष्म परीक्षण होणे’, असे त्रास होतात. ते असेच काही दिवस चालू दिले, तर माझ्‍या आध्‍यात्मिक त्रासात पुष्‍कळ वाढ होऊन तो त्रास न्‍यून करण्‍यासाठी मला काही दिवस, कधी काही आठवडे किंवा काही वेळा काही महिनेही अन्‍य काही सेवा न करता केवळ आध्‍यात्मिक उपाय करावे लागतात.

२ अ. आध्‍यात्मिक त्रास होण्‍याच्‍या वेळेनुसार नामजपादी उपाय केल्‍यामुळे त्रासात लवकर आणि पुष्‍कळ घट होणे : एका सत्‍संगात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारले, ‘‘आपल्‍याला आध्‍यात्मिक त्रास कधी अधिक प्रमाणात होतो ?’ आणि ‘आध्‍यात्मिक उपायांचा परिणाम किती काळ टिकतो ?’, याचा अभ्‍यास करून त्‍यानुसार आध्‍यात्मिक उपाय करणे महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्‍यावर त्रास होत असल्‍यास सकाळीच उपाय करा. दुपारनंतर त्रास होत असल्‍यास सकाळच्‍या वेळी सेवा करून दुपारी आध्‍यात्मिक उपाय करा.’’ मला सकाळच्‍या तुलनेत संध्‍याकाळी आणि रात्री अधिक त्रास होतो; म्‍हणून मी गुरुदेवांनी केलेल्‍या मार्गदर्शनानुसार एकूण आध्‍यात्मिक उपायांपैकी ३० टक्‍के उपाय सकाळी आणि ७० टक्‍के उपाय संध्‍याकाळी करू लागलो अन् सकाळी ज्ञानाच्‍या टंकलेखनाची सेवा करू लागलो. असे केल्‍यामुळे माझा त्रास न्‍यून होण्‍यासाठी पुष्‍कळ साहाय्‍य झाले.

२ आ. लिखाणाच्‍या धारिकेत आरंभी आणि शेवटी नामजप लिहिणे : वर्ष २०२० मध्‍ये सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या प्रत्‍येक पानाभोवती ‘॥ ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ॥’, असे मंडल करायला सांगितले होते. त्‍यातून शिकून मीही माझ्‍या धारिकेचे टंकलेखन करतांना धारिकेच्‍या आरंभी, मध्‍यभागी आणि शेवटी देवतेचा किंवा निर्गुणाशी संबंधित (शून्‍य, महाशून्‍य, निर्गुण, ॐ किंवा निर्विचार) नामजप लिहायला आरंभ केला. असे केल्‍यामुळे मला ज्ञानाचे टंकलेखन करतांना होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्‍यात्मिक त्रास ५० – ६० टक्‍के न्‍यून झाले. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीही मला असे लिहायला अनुमती दिली, तसेच माझ्‍या लिखाणाचे संकलन करणार्‍या साधिकांनीही ‘धारिकेत लिहिलेले नामजप बघून चांगले वाटते आणि त्‍यामुळे नामजपाची आठवण होते’, असे उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिले. त्‍यामुळे ‘धारिकेत नामजप लिहिल्‍याचा सर्वांनाच लाभ होतो’, असे माझ्‍या लक्षात आले. ‘धारिकेत नामजप लिहिणे’, हा आध्‍यात्मिक उपाय केल्‍यामुळे माझे न्‍यून झालेले काही त्रास येथे दिले आहेत.

१. ज्ञानाचे टंकलेखन करतांना मध्‍येच ‘काही न सुचणे, अर्थ न कळणे, ज्ञान न कळणे’ इत्‍यादी त्रास होणे पुष्‍कळ न्‍यून झाले.

२. सोप्‍या भाषेत आणि थोडक्‍यात ज्ञान लिहिता येऊ लागले.

३. आधी ज्ञानाचे टंकलेखन केल्‍यावर अंग जड होऊन ते जडत्‍व न्‍यून होण्‍यासाठी विश्रांती घ्‍यावी लागत असे. हा त्रास ७० – ८० टक्‍के न्‍यून झाला.

(क्रमश:)

– श्री. निषाद देशमुख (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०२४, दुपारी १.३५ ते २.१८)

  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या नंतरचा भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/805239.html