सूक्ष्मज्ञान मिळवण्याची सेवा करतांना होणारे आध्यात्मिक त्रास आणि त्यावर नामजपादी उपाय केल्यामुळे झालेले लाभ !

‘आम्हा सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना (मी, श्री. राम होनप आणि सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना) सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त करण्याची सेवा करता येऊ नये’, यासाठी सूक्ष्मातील अनिष्ट शक्ती आमच्यावर विविध प्रकारे आक्रमणे करतात. या सूक्ष्मातील आक्रमणांमुळे ज्ञानप्राप्तीची सेवा करतांना आम्हाला विविध प्रकारचे आध्यात्मिक त्रास होतात; पण गुरुकृपा आणि संतांचे मार्गदर्शन यांमुळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर या त्रासांवर मात करून ज्ञानप्राप्तीची सेवा करता येते. या संदर्भात मला जाणवलेल्या सूत्रांपैकी काही सूत्रे १७ जून या दिवशी या दिवशी पाहिली. आज पुढील सूत्रे पाहूया.

(भाग २)

या आधीचा भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/804845.html

श्री. निषाद देशमुख

२. ज्ञानाचे टंकलेखन किंवा सूक्ष्म परीक्षण करतांना आध्यात्मिक त्रासात वाढ होणे

२ इ. सूक्ष्म परीक्षण करतांना स्वतःभोवती मानस संरक्षककवच निर्माण करणे : वर्ष २०१९ मध्ये सनातनच्या रामनाथी आश्रमात एक संत आले होते. त्या संतांना आध्यात्मिक त्रास होता, तरी ते अन्य लोकासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करून त्यांचे शारीरिक त्रास काही प्रमाणात बरे करायचे. या संदर्भात बोलतांना त्या संतांनी सहज सांगितले, ‘मी उपाय करण्यापूर्वी माझ्या भोवती ‘ॐ’चे सूक्ष्म संरक्षककवच बनवतो.’ त्यांची ही युक्ती ऐकून सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी आम्हाला सुचवले, ‘आपणही आपल्याभोवती नामजपाचे संरक्षककवच बनवू शकतो.’ आता मी सूक्ष्म परीक्षण करतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला सांगितल्यानुसार आधी माझ्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण काढतो आणि त्यानंतर माझ्याभोवती ‘प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीप्रमाणे’ शोधून मिळालेल्या नामजपाचे किंवा ‘निर्विचार’ या समष्टी नामजपाचे मानस संरक्षककवच निर्माण करतो. मानस संरक्षककवच केल्यावर मला काही प्रमाणात झालेले लाभ येथे दिले आहेत.

१. आधी सूक्ष्म परीक्षण केल्यानंतर मला थकवा यायचा. तो पूर्वीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के न्यून झाला आहे.

२. आधी सूक्ष्म परीक्षण करतांना १५ – २० मिनिटांनंतर माझ्यावर त्रासदायक शक्तींचे आवरण निर्माण होत असे. आता मानस संरक्षककवच केल्यामुळे त्रासदायक शक्तींचे आवरण १ घंटा किंवा त्याहून अधिक कालावधीनंतर येते.

३. आधी सूक्ष्म परीक्षण करतांना मनात अनावश्यक विचार यायचे किंवा इतर सूत्रांशी निगडित ज्ञान मिळायचे. मानस संरक्षककवच निर्माण केल्यामुळे मनाची एकाग्रता वाढून ‘अनावश्यक विचार येणे किंवा अन्य सूत्रांचे ज्ञान मिळणे’, न्यून झाले आहे.

३. नियमितपणे आध्यात्मिक उपाय करण्याचे प्रयत्न केल्यामुळे टप्प्याटप्प्याने आध्यात्मिक त्रासाची तीव्रता न्यून होणे

वरीलप्रमाणे सर्व प्रयत्न करून सेवा करू लागल्यावर मला होत असलेले आध्यात्मिक त्रास न्यून झाले.

३ अ. त्रासाचा कालावधी न्यून होणे : आधी मला प्रत्येक मासात १५ दिवस ‘रात्री झोप न लागणे’, ‘पोट साफ न झाल्यामुळे अपचनाचा त्रास होणे’, ‘रक्तातील साखर वाढल्यामुळे गरगरणे’, ‘थकवा येऊन झोपून रहावे लागणे’, असे त्रास होत होते. यासाठी मला औषधोपचारांसह १ मास प्रतिदिन ५ घंटे नामजप करावा लागत असे. आता मला हा त्रास मासातून एक दिवस होतो आणि ५ दिवस किंवा त्याच दिवशी ५ घंटे आध्यात्मिक उपाय केल्यानंतर तो त्रास नाहीसा होतो.

३ आ. आध्यात्मिक त्रास न्यून होऊन शारीरिक त्रास थोडे वाढणे : आधी ज्ञानाचे टंकलेखन किंवा सूक्ष्म परीक्षण करण्यासाठी माझा आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ संघर्ष व्हायचा. तेव्हा मला ‘लिखाणाची स्फूर्ती न होणे, कंटाळा येणे, लिखाण किंवा सूक्ष्म परीक्षण करतांना सूक्ष्मातून ज्ञान न मिळणे, न सुचणे, लिहितांना गोंधळायला होणे, डोक्यावर दाब जाणवणे, डोके दुखणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, अंधुक दिसणे’, असे त्रास व्हायचे. नियमित आध्यात्मिक उपाय केल्यामुळे माझे शारीरिक त्रास थोडे वाढले; पण आध्यात्मिक त्रास न्यून झाले.

३ आ १. मनाचा निश्चय करून ज्ञानाचे टंकलेखन किंवा सूक्ष्म परीक्षण करू लागल्यास आध्यात्मिक त्रास होणे बंद होणे : ज्ञानाचे टंकलेखन किंवा सूक्ष्म परीक्षण करायला आरंभ करण्यापूर्वी मला वर नमूद केलेले आध्यात्मिक त्रास होऊ लागतात; मात्र मनाचा निश्चय करून ज्ञानाच्या टंकलेखनाचे नियोजन किंवा त्या संदर्भात चिंतन करू लागल्यावर सर्व त्रास बंद होऊन हलके वाटते. ज्ञानाच्या टंकलेखनासाठी बसल्यावर किंवा सूक्ष्म परीक्षणाची सेवा करायला आरंभ केल्यावर सर्व त्रास नाहीसे होतात.

३ आ २. ज्ञानाचे टंकलेखन केल्यावर होणारे शारीरिक त्रास : जानेवारी २०२४ पासून ज्ञानाचे टंकलेखन करतांना मला शारीरिक त्रास होत नाही; पण ज्ञानाचे टंकलेखन करून झाल्यावर मला अकस्मात् डोळे लाल होणे, पुष्कळ शिंका येणे, सर्दी होणे इत्यादी त्रास होतात.’ (क्रमश:)

– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामानाथी, गोवा. (२.२.२०२४, दुपारी १.३५ ते २.१८)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक