Elon Musk On EVM : कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (‘एआय’द्वारे) इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ‘हॅक’ केले जाऊ शकते ! – इलॉन मस्क

इलॉन मस्क यांचा दावा !

अमेरिकेतील ‘टेस्ला’ आस्थापनाचे मालक इलॉन मस्क

नवी देहली – अमेरिकेतील ‘टेस्ला’ आस्थापनाचे मालक इलॉन मस्क यांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे घेऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे, ‘इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे रहित केली पाहिजेत. मानव किंवा कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) यांद्वारे ही यंत्रे ‘हॅक’ होण्याचा धोका आहे. जरी हा धोका अल्प वाटत असला, तरीही तो पुष्कळ अधिक आहे.’

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाकडून, तर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे.

भारतातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’सारखे ! – राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी इलॉन मस्क यांची पोस्ट पुनर्प्रसारित (रिपोस्ट) करत म्हटले की, भारतातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’सारखे (यामध्ये विमानातील वैमानिकांचे संभाषण मुद्रित होत असते.) आहे. त्याची चौकशी करण्यास कुणालाही अनुमती नाही.

आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेविषयी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते. (भारतातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे सुरक्षित असल्याचे निवडणूक आयोगाने वारंवार स्पष्ट केले आहे. भारतीय न्याययंत्रणेनेही त्यास दुजोरा दिला आहे. असे असतांना एका विदेशी व्यक्तीवर विश्‍वास दाखणारे राहुल गांधी भारतीय यंत्रणांचा अपमान तर करत आहेतच; पण भारतीय लोकशाहीवर अविश्‍वासही दाखवत आहेत. अशांवर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)

भारतात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सुरक्षित ! – भाजपचे नेते राजीव चंद्रशेखर

भाजपचे नेते राजीव चंद्रशेखर

इलॉन मस्क यांच्या विधानावर भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले की, इलॉन मस्क यांची शंका अमेरिका आणि इतर देशांत कदाचित् खरी ठरत असेल; पण भारतात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये काही विशेष पालट करण्यात आले आहेत. यात सुरक्षिततेचे सर्व उपाय आहेत. आमच्या यंत्रात ब्लूटूथ, वाय-फाय, इंटरनेट यांसारखी कोणतीही सुविधा नाही. भारतासारखेच मतदान यंत्र इतर देशही बनवू शकतात. उपरोधिक टीका करतांना ते म्हणाले की, इलॉन मस्क यांना सांगू इच्छितो की, हवे तर आम्ही त्यांसाठी शिकवणी वर्ग घेऊ शकतो.