वागातोर येथे रात्री होणार्‍या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला !

स्थानिक रहिवाशांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

म्हापसा, १३ जून (वार्ता.) – वागातोर येथे रात्री १० वाजल्यानंतर क्लबमधून होणार्‍या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्याची मागणी स्थानिकांनी उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांच्याकडे केली आहे. पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी नुकतीच हणजूण पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा करून तेथील परिसराची पहाणी केली. पोलीस अधीक्षक अक्षत कौशल हणजूण पोलीस ठाण्यात आल्याची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर स्थानिकांच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी शिष्टमंडळाने ही मागणी केली.

स्थानिकांनी रात्री १० वाजल्यानंतर क्लबमधून रात्रभर ध्वनीप्रदूषण होत आहे आणि याचा ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थीवर्ग आणि इतर यांना त्रास होत आहे, असे त्यांना सांगितले. या वेळी पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी स्थानिकांना यासंबंधी लेखी तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर स्थानिकांनी त्वरित ध्वनीप्रदूषण करत असलेल्या क्लबची नावे असलेली लेखी तक्रार पोलिसांना दिली. नागरिकांच्या मते त्यांनी ध्वनीप्रदूषणावरून यापूर्वी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत; मात्र यामधून काहीच निष्पन्न झालेले नाही.

संपादकीय भूमिका 

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना मोठ्या आवाजातील ध्वनी ऐकू येत नाही कि ते जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करतात ?