पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदाराने भारतीय निवडणुकांचे केले कौतुक !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाचे खासदार शिबली फराज यांनी पाकच्या संसदेत पाकमधील सार्वत्रिक निवडणुकीवर टीका करत भारताच्या निवडणूक प्रक्रियेचे कौतुक केले आहे. फराज म्हणाले, ‘‘मला आपल्या शत्रू देशाचे उदाहरण द्यायचे नाही. नुकतेच तिथे निवडणुका झाल्या आहेत. ८० कोटी लोकांनी मतदान केले. सहस्रो मतदानकेंद्रे उभारली गेली. काही ठिकाणी एका व्यक्तीसाठी मतदानकेंद्र उभारले गेले. निवडणुकीची प्रक्रिया एका मासाहून अधिक काळ चालली. तेथे इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे निवडणुका घेण्यात आल्या.
या काळात निवडणुकीत गडबड झाली, असा एकही आवाज उठला होता का ? जगातील सर्वांत मोठी लोकशाही असूनही भारताने फसवणुकीचा आरोप न करता मोठ्या प्रमाणावर निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या. आम्हालाही पाकिस्तानात तेच हवे आहे.’’
फराज पुढे म्हणाले की, हा पक्ष जिंकला कि तो जिंकला,यामध्येच देशाने अडकून रहावे, अशी आमची इच्छा नाही. अशा गोष्टींमुळेच आपली राजकीय व्यवस्था पूर्णपणे पोकळ झाली आहे. आम्ही आमच्या निवडणुकाही मुक्त आणि निष्पक्षपणे का घेऊ शकत नाही?
पाकिस्तानच्या निवडणुकीवर प्रश्न उपस्थित झाले !
पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी या दिवशी सार्वत्रिक निवडणुका झाल्या; मात्र याआधीच कुणाचे सरकार सत्तेवर येणार, हे स्पष्ट झाले होते. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची संपूर्ण पाकिस्तानात लाट होती; पाक सैन्याला इम्रान खान आवडत नाहीत. ‘नवाझ शरीफ पुन्हा सत्तेवर यावे’, अशी सैन्याची इच्छा होती. इम्रान खान यांच्या पक्षाला निवडणुकीत उमेदवार उभे करण्यास बंदी घालण्यात आली होती. निकाल आल्यावर हेराफेरीचे आरोप झाले. इम्रान खान यांना पाठिंबा देणार्या अपक्ष उमेदवारांना बलपूर्वक पराभूत करण्यात आल्याचे आरोप झाले होते.
या प्रकरणी अमेरिकेच्या ३१ खासदारांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांना पत्र पाठवून ‘निवडणुकीतील हस्तक्षेपाच्या आरोपांची चौकशी होईपर्यंत पाकिस्तानच्या नव्या सरकारला मान्यता देऊ नये’, अशी मागणी केली होती. पाकिस्तानातील निवडणुका शांततेत पार पडल्या नव्हत्या. ८ फेब्रुवारी या दिवशी भ्रमणभाष सेवा बंद करण्यात आली होती. अनेक भागात हिंसाचारही पाहायला मिळाला. निवडणूक निकाल घोषित होण्यासही विलंब झाला. त्यामुळे हेराफेरीचा संशय बळावला होता.
संपादकीय भूमिकापाकिस्तानमध्ये असे कधीही होऊ शकत नाही; कारण तेथे लोकशाही नाही, तर सैन्यशाही चालते, हे वास्तव आहे ! |