अल्पवयीन मुलाच्या माता-पित्यांसह मकानदार यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ !

कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरण !

शिवानी अग्रवाल (डावीकडे) व विशाल अग्रवाल (उजवीकडे)

पुणे – कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणातील कारचालक अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने नष्ट करण्यात आले. या प्रकरणात सखोल अन्वेषण करण्याची आवश्यकता असल्याने न्यायालयाने अग्रवाल दांपत्यांसह (वडील विशाल आणि आई शिवानी) अशफाक मकानदार यांच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ केली आहे. अग्रवाल दांपत्यांसह अशफाकची पोलीस कोठडीची समयमर्यादा १० जून या दिवशी संपली. त्यानंतर त्यांना यु.एम्. मुधोळकर यांच्या न्यायालयामध्ये उपस्थित केले होते. न्यायालयाने १४ जून या दिवसापर्यंत पोलीस कोठडीचा निर्णय दिला आहे.

आरोपी मकानदार याने ‘ससून’मधील शिपाई अतुल घटकांबळे यांच्याद्वारे डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हळनोर यांना पैसे दिले. ते पैसे कुणी दिले ? कुणाच्या सांगण्यावरून दिले ? याचे अन्वेषण करावयाचे आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी न्यायालयात दिली. अपघात प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर अशफाक पसार होता. त्याला कुणी साहाय्य केले ? तो आरोपी डॉ. अजय तावरे यांच्या संपर्कात कसा आला ? याचे अन्वेषण करायचे असल्याने, अल्पवयीन मुलाचे वडील विशाल, आई शिवानी आणि मकानदार यांच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती.

जामिनासाठी सरकारी अधिवक्त्यांचा विरोध; २१ जून या दिवशी निर्णय होण्याचा अंदाज !

अल्पवयीन मुलाने पबमध्ये मित्रांसोबत पार्टीसाठी नोंदणी केली होती. त्या पबचे मालक आणि कर्मचार्‍यांनी मुलांच्या वयाविषयी निश्चिती न करता त्यांना मद्य विक्री केली. या प्रकरणांतील आरोपींना जामीन संमत झाल्यास ते पुराव्यांमध्ये छेडछाड (पालट) करतील, असा युक्तीवाद करत आरोपींच्या जामीन अर्जास विरोध करण्यात आला. न्यायालयामध्ये विशेष सरकारी अधिवक्त्या विद्या विभूते आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी विरोध केला.

या गुन्ह्याचे अन्वेषण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत अन्वेषणामध्ये आरोपींनी साहाय्य केले आहे. त्यांच्या विरोधातील नोंद केलेला गुन्हा हा जामीनपात्र आहे, त्यामुळे त्यांना जामीन मिळावा, असा युक्तीवाद बचाव पक्षाकडून अधिवक्ता एस्.के. जैन, सुधीर शहा, अमोल डांगे आणि प्रशांत पाटील यांनी केला. बचाव पक्ष आणि सरकारी पक्ष यांनी केलेल्या युक्तीवादानंतर जामीन अर्जावर न्यायालयाने निर्णय दिला नाही. आता जामीन अर्जावर २१ जून या दिवशी निर्णय होणार असल्याचे समजते. या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, ‘कोझी पब’चे मालक नमन भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, ‘ब्लॅक पब’चा साहाय्यक व्यवस्थापक संदीप सांगळे, व्यवस्थापक जयेश गावकर, कर्मचारी नीतेश शेवानी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.