महापालिका कर्मचारी बनून केबलची चोरी करणारे ६ जण अटकेत !

६ लाख ८० सहस्र रुपयांची केबल चोरली

मुंबई – महानगर टेलिफोन निगम लिमिटेड आस्थापनाने माटुंगा पोलीस ठाण्यात केबल चोरीची तक्रार प्रविष्ट केली होती. त्या प्रकरणी ३१ मे या दिवशी नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी महापालिका कर्मचारी बनून ६ लाख ८० सहस्र रुपयांची केबल चोरली. मनीष मगनलाल जैन, निक्कू चनीलाल गुप्ता, नरेश गोपाल अहिरे, महेश मल्लेश बुडामुला, अशोक रमेश सूर्यवंशी, कैलास देवदत्त जाधव अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १८४ किलो तांबे जप्त केले आहे.

कुणालाही संशय येऊ नये; म्हणून चोरांनी महापालिकेच्या बॅरिकेड्सचा वापर केला. त्या बॅरिकेड्सवर काम चालू असल्याचे लिहिले होते. त्यानंतर या चोरट्यांनी ३५० मीटर रस्ता खोदून ६ लाख ८० सहस्र रुपये किमतीचे तांबे चोरले. परिसरातील दूरभाष बंद असल्याची तक्रार आल्यानंतर आस्थापनाच्या पथकाने पहाणी केल्यावर हा प्रकार उघड झाला. ६ आरोपींना १३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

असा खोटेपणा करणार्‍यांना कारागृहातच डांबायला हवे !