Jaipur Protest : जयपूर (राजस्थान) येथे ४ हिंदूंचे मृतदेह पोचल्यावर स्थानिक हिंदूंकडून रस्तावर उतरून आंदोलन

  • जम्मू येथे हिंदु भाविकांवरील आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण

  • पाकिस्तानच्या विरोधात संताप

जयपूर (राजस्थान) – जम्मूतील रियासी येथे हिंदु भाविकांच्या बसवर झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणात ९ जणांचा मृत्यू झाला. त्यांतील ४ जण जयपूर येथील  होते. त्यांचे मृतदेह जयपूर येथील चौमुनमध्ये ११ जून या दिवशी आणण्यात आले. त्यानंतर स्थानिक हिंदूंकडून पाकिस्तानच्या विरोधात घोषणा देत रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. राजेंद्र सैनी, ममता सैनी, पूजा सैनी आणि लहान मुलगा किट्टू यांचा या आक्रमणात मृत्यू झाला होता.

२ पोलीस ठाण्यांबाहेर आंदोलन

चौमुन शहरातील संतप्त लोक रस्त्यावर आले. मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईक आणि आंदोलकांनी नकार दिला आहे. जयपूरमध्ये मुरलीपुरा आणि चौमुन पोलीस ठाण्यांजवळ सर्व समाजाच्या वतीने निदर्शने केली जात आहेत. परिस्थिती पाहता दोन्ही ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांनी बाजारपेठाही बंद ठेवली आहे.

मृतांच्या नातेवाइकांना १ कोटी रुपये हानीभरपाई देण्याची मागणी

दोन्ही ठिकाणी नागरिकांची आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची वाढती गर्दी पाहून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोचले. ते आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते; मात्र आंदोलक एकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलक मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी, म्हणजे ४ कोटी रुपयांची भरपाई आणि त्यांच्या आश्रितांना सरकारी नोकरी देण्याची मागणी करत आहेत. ‘मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतांचे अंतिम संस्कार केले जाणार नाहीत’, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

संपादकीय भूमिका 

हिंदूंनी वैधमार्गाने शासनकर्त्यांवर दबाव आणल्यावर जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट करण्याचा प्रयत्न होईल, अशी अपेक्षा !