मद्यपी शिक्षकांना शिक्षा !

विद्यार्थ्यांनी एका शिक्षकाला चपलांनी चोप देत वर्गातून हाकलून लावल्याची घटना छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी एक शाळेत घडली. हा शिक्षक प्रतिदिन दारू पिऊन यायचा आणि वर्गात झोपायचा. घटनेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षकाला तास घेण्यास सांगितले, तेव्हा शिक्षकाने विद्यार्थ्यांना घाणेरड्या शिव्या देणे चालू केले. तेव्हा वर्गातील समस्त विद्यार्थ्यांनी मिळून त्या शिक्षकाला चपलांनी चोप दिला. याचे चलचित्र प्रसारित झाले आहे. जिथे विद्यादानाचे कार्य चालते, जिथे शालेय अभ्यासक्रमासह मुलांना नैतिकतेचे धडे दिले जातात, देशाचे आदर्श भावी नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांवर संस्कारांची पखरण केली जाते, अशा पवित्र जागेवर दारू पिऊन येणार्‍या आणि विद्यार्थ्यांना घाणेरड्या शिव्या देणार्‍या शिक्षकाला योग्य शिक्षा मिळाली. शिक्षक प्रतिदिन शाळेत दारू पिऊन येत असतांना शाळेचे प्रशासन झोपा काढत होते का ? शिक्षकाला पाठीशी घालणार्‍या शाळा प्रशासनावरही कठोर कारवाई झाली पाहिजे. शिक्षकाने शाळेत दारू पिऊन झोपा काढणे ही हद्द झाली. ‘माझे कुणी वाकडे करू शकणार नाही’, हा माजही यामध्ये आहे. हा माज उतरवणारे विद्यार्थी अभिनंदनास पात्र आहेत.

आपल्याला नेमून दिलेल्या कामाच्या मोबदल्यात मासिक वेतन मिळते. त्यामुळे कामाशी प्रामाणिक राहून, स्वतःच्या कौशल्याचा वापर करून नागरिकांना सेवा देणे, हे सेवा उपक्रमाशी निगडित असलेल्या कर्मचार्‍यांचे आद्यकर्तव्य आहे. स्वकर्तव्य सोडून कामाच्या वेळेत वैयक्तिक काम करत रहाणे, कामाच्या वेळेत जागेवर उपस्थित न रहाणे, कामावरचे नियम आणि कार्यपद्धती न पाळणे, सहकर्मचार्‍यांशी गप्पा मारण्यात वेळ वाया घालवणे, नागरिकांना ताटकळत ठेवणे, वेळेत काम करण्याच्या मोबदल्यात गरजवंतांकडून धनाची मागणी करणे, धन न देणार्‍याला कार्यालयात पुन्हा पुन्हा चकरा मारावयास लावणे यांसारखे प्रकार सरकारी कार्यालये, पोलीस ठाणी, रुग्णालये यांसारख्या ठिकाणी सर्रास घडतांना दिसतात. वाद टाळण्याच्या दृष्टीने आणि आपल्या कामात आडकाठी नको म्हणून बर्‍याचदा नागरिक या कामचुकारांना विरोध करणे टाळतात. परिणामी त्यांना कामात टाळाटाळ करण्याची सवय लागून एक प्रकारचा माज चढतो. हा माज कसा उतरवायचा ? याचा धडा छत्तीसगढमधील विद्यार्थ्यांनी घालून दिला आहे. हे विद्यार्थी या शिक्षकाला प्रतिदिन सहन करत होते, शेवटी सहनशक्ती मर्यादेपलीकडे गेल्याने त्यांनी पुढचे पाऊल उचलले. सरकार दरबारी कामे न करणारे, पैसे मागणारे, पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करून न घेणे असे करणार्‍या उद्दामांकडून होणारा अन्याय सहन करणे, म्हणजेच अन्यायाला खतपाणी घालणे होय. कामचुकार आणि भ्रष्ट महाभागांच्या विरोधात तक्रार करत रहाणे, त्यांच्या विरोधात संघटित होणे, हे जागरूक नागरिकाचे दायित्व आहे.

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई