रस्त्यांवरील वाहतूक आणि खड्डे चुकवतांना पाठीचे मणके खिळखिळे होऊन जातात. त्यातून लांबपर्यंत दुचाकीवरून प्रवास पाठीच्या कण्यावर चांगलाच ताण आणणारे आहे. सध्याच्या रुग्णांमध्ये कंबरेच्या मणक्यात दोष असण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. त्यातच आपण सर्वच गोष्टी उभ्याने करत असतो. ओट्यापाशी उभे राहून स्वयंपाक बनवणे, मग जेवण ‘डायनिंग टेबल’वर जेवणे आणि मग सोफा किंवा खुर्ची या सगळ्या हालचालींमध्ये विशेषतः कंबर अन् मान यांच्याकडे लक्ष दिले जात नाही. पायही सतत एकाच स्थितीत असल्याने पायाचे छोटे सांधे किंवा पावले दुखणे, हे लक्षण दिसते. विशेषतः कणीक मळतांना किंवा पोळ्या करतांनाही हे त्रास होतात, अशा तक्रारी येतात. त्यातून पोटात गॅसेस (वायू), मलावरोध या तक्रारी असतील, तर हे त्रास अजून जाणवतात.
आपल्याकडे घरात कामासाठी मदतनीस म्हणून मावशी येत असतात, थंडी असो वा उन्हाळा असो, त्यांचे पाण्यात सतत काम असते. ‘आदल्या दिवशीची पोळी/भात दुसर्या दिवशी खाणे, म्हणजे शिळे खाणे असते’, हे त्यांना बर्याचदा ठाऊक नसते. प्रतिदिन घरात उरलेली पोळी नाश्त्याला करून हा महिलावर्ग बाहेर कामासाठी जात असतो. असे शिळे आणि तिखट खाणे, सततचे उभ्याने काम आणि पाण्यातील सलग कामे अशा पद्धतीचे काम असणार्या सगळ्या व्यक्तींमध्ये छोटे सांधे दुखणे किंवा हाताची पेर, मनगटाचे सांधे दुखणे, सुजणे हे लक्षण पुष्कळ सामान्यपणे दिसते.
त्यात वेदनाशामक गोळी घेत राहून काम करत रहाणे आणि दुखणे अंगावर काढणे यांमुळे या वेदना वाढत रहातात. अगदी प्रतिदिन वेदनाशामक गोळ्या किंवा इंजेक्शन घेत रहाणारे भरपूर लोक आहेत; कारण तसे केले, तर वेदना आटोक्यात येतात, हेच त्यांना ठाऊक असते. आमच्याकडील मदतनीस वर्ग जेव्हापासून आमच्याकडे येत आहे, तेव्हापासून पूर्णपणे आयुर्वेद औषधे घेत आहे, ज्याचा त्यांना लाभ होत आहे; कारण संधीवात, आमवात यांसारख्या व्याधी पटकन आटोक्यात येणार्या नाहीत आणि काम सोडून घरी बसणे परवडण्यासारखेही नसते. यासाठी पुढील काही गोष्टी करता येतील –
१. किमान २० मिनिटे पुढे-मागे वाकण्याचे व्यायाम/योगासने करणे.
२. व्यायामाला अजिबातच वेळ होत नसल्यास कामे करतांनाच मुद्दाम थोडा वेळ खाली बसणे, उठणे, घरातील पसारा आवरतांना मुद्दाम वाकून मग उठणे, स्वयंपाकघरात काम करतांना, गाडीतून प्रवास करत असतांना हात आणि पाय यांच्या छोट्या सांध्यांचे व्यायाम करणे.
३. स्वयंपाक करतांना मानेचे आणि हाताच्या सांध्यांचे व्यायाम करणे.
४. आम्लपित्त आणि मानदुखी यांचा जवळचा संबंध असल्याने त्याकडे लक्ष देणे.
५. पोट पूर्ण साफ होण्याकडे लक्ष ठेवणे.
६. जागरण, शिळे अन्न, आंबट-खारट-तिखट चवींचे आणि कोरडे खाणे कमी ठेवणे.
७. स्तनपान करणार्या महिला वर्गाने ‘पोश्चर’कडे (शरिराच्या ठेवणीकडे) विशेष लक्ष ठेवणे.
८. मान, सांधे, कंबर यांना अंघोळीच्या आधी नियमित तेल लावणे.
प्रतिदिन अशा काही करता येण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्यामुळे सध्याच्या विशेषतः सांध्याचे त्रास वाढवणार्या सर्व दिनचर्येच्या तोट्यांना आळा बसेल.
– वैद्या स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.