Billionaire Sajid Tarar : भविष्यात जगाला भारताच्या लोकशाहीतून पुष्कळ शिकायला मिळेल !

अमेरिकेतील पाकिस्तानी वंशाचे उद्योगपती साजिद तरार यांचे विधान !

डावीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेतील पाकिस्तानी वंशाचे उद्योगपती साजिद तरार

वॉशिंग्टन (अमेरिका) – एक दिवस असा येईल की, जगाला भारताच्या लोकशाहीतून पुष्कळ काही शिकायला मिळेल, असे विधान अमेरिकेतील पाकिस्तानी वंशाचे प्रसिद्ध उद्योगपती साजिद तरार यांनी केले आहे.

तरार पुढे म्हणाले की, भारतात जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे. भारतात ९७ कोटींहून अधिक लोक त्यांच्या मताधिकाराचा वापर करत आहेत, हे चमत्कारापेक्षा अल्प नाही. वर्ष २०२४ मध्ये भारताने साधलेला विकास आश्‍चर्यकारक आहे. जगभरातील देशांसाठी हे एक उदाहरण आहे.

पंतप्रधान मोदी जगासाठी चांगले नेते !

साजिद तरार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी म्हटले की, पंतप्रधान मोदी हे केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी चांगले नेते आहेत. मोदी हे एक अद्भुत नेते आहेत. ते असे पंतप्रधान आहेत, ज्यांनी तणाव असतांनाही पाकिस्तानला भेट दिली आणि आपली राजकीय प्रतिमा धोक्यात आणली. एक दिवस पाकिस्तानलाही त्यांच्यासारखा नेता मिळेल. मला आशा आहे की, मोदीजी पुन्हा पाकिस्तानशी चर्चा करतील. दोन्ही देशांमधील व्यापार, तसेच शांततापूर्ण पाकिस्तान भारतासाठीही चांगला आहे.