पाळधी (जळगाव) येथील श्री. विनोद शिंदे यांनी अयोध्येतील श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी केलेल्या सेवा आणि त्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. प्रभु श्रीरामचंद्राच्या नामपट्टीची मागणी करण्याविषयी मनात विचार येणे आणि त्याप्रमाणे समाजातून अधिक प्रमाणात मागणी मिळणे

श्री. विनोद शिंदे

‘अयोध्येतील श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आरंभी जिल्ह्यातून प्रभु रामचंद्राच्या १५ सहस्र नामपट्ट्यांची मागणी मिळाली होती. तेव्हा माझ्या मनात ‘प्रसारकार्य मोठा असलेला आपला जिल्हा असतांना ही मागणी अल्प आहे’, असा विचार आला आणि देवाला प्रार्थना झाली, ‘देवा, तूच आमच्याकडून सेवा करून घे. व्यापक स्तरावर हिंदूंच्या घराघरांमध्ये प्रभु श्रीरामचंद्राचे नामस्मरण करून घे.’ तेव्हा लगेच एका साधकाने १० सहस्र नामपट्ट्यांची मागणी केली. त्यानंतर विविध ठिकाणच्या साधकांशी बोलून घेतले. संस्थेकडे मागणी करतांना प्रत्येक वेळी मी ५० टक्के अतिरिक्त नामपट्ट्यांची मागणी करत होतो. त्याप्रमाणे नामपट्ट्या प्राप्त होताच समाजातून अतिरिक्त ५० टक्के मागणी मिळालेली असायची. तेव्हा ‘सर्व ईश्वरी नियोजनानुसार चालू आहे’, याची अनुभूती घेता येत होती.

२. ‘खर्ची’ गावातील विठ्ठल मंदिराची स्वच्छता केल्यावर पावित्र्य वाढल्याचे जाणवणे

खर्ची गावातील श्री विठ्ठलाच्या मंदिरामध्ये दोन मासांपासून सनातन संस्थेच्या सत्संगाचे आयोजन चालू होते. सत्संगांमध्ये गावातील सर्व मंदिरांच्या स्वच्छतेच्या समवेत या मंदिराच्या स्वच्छतेचेही नियोजन करण्यात आले. स्वच्छतेमध्ये सत्संगातील महिला आणि मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. अनेक वर्षांपासून भंगलेल्या मूर्ती आणि दूषित झालेली देवतांची चित्रे हे सर्व भावपूर्णरितीने विसर्जन केले. गुरुकृपेने आणि प्रभु श्रीरामाच्या कृपेने त्या मंदिरातील सात्त्विकता वाढल्याची अनुभूती घेता आली.

३. सत्संगातील १२ साधिकांनी १० दिवस गावामध्ये प्रतिदिन प्रत्येकाच्या घरी जाऊन अर्धा घंटा प्रभु श्रीरामचंद्राचे नामस्मरण करणे

सत्संगामध्ये प्रभु श्रीरामचंद्राचे महत्त्व, प्राणप्रतिष्ठा होण्यामागील शास्त्र आणि रामतत्त्वाचा लाभ होण्याचे महत्त्व अशी सूत्रे सांगितल्यानंतर सत्संगातील १२ महिलांनी पुढाकार घेऊन १० दिवस गावामध्ये प्रतिदिन प्रत्येकाच्या घरी जाऊन अर्धा घंटा प्रभु श्रीरामचंद्राचे नामस्मरण केले. तेव्हा प्रभु श्रीरामचंद्राच्या नामजपातील आनंद सत्संगातील सर्व साधिकांच्या चेहर्‍यावर अनुभवता आला. ‘सर्व जण प्रभु श्रीरामचंद्राच्या भक्तीमध्ये लीन झाले आहेत’, याची अनुभूती घेता आली.

४. पाळधी गावातील सर्व मंदिरांमध्ये आणि प्रत्येक चौकात सामूहिक आरत्यांचे नियोजन करणे

समस्त हिंदु बांधवांनी संपूर्ण गावाला त्या दिवशी समष्टी भक्तीचा आनंद घेता येण्यासाठी आपापल्या विभागातील मंदिरांचे दायित्व घेऊन एकाच वेळी संपूर्ण गावात आरती केली. ज्या विभागात मंदिर नव्हते, तेथे चौकामध्ये श्रीरामाची प्रतिमा स्थापन करून आरती करण्यात आली. माझे मन हे भक्तीमय वातावरण बघून कृतज्ञतेने भरून आले.

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हीच माझा सांभाळ करावा. तुम्हीच माझ्याकडून साधना करून घ्यावी, हीच प्रार्थना !’

– श्री. विनोद शिंदे, पाळधी, जळगाव. (फेब्रुवारी २०२४)