विनाकारण गोव्याला अपकीर्त करण्याचे काम चालू असल्याचा आरोप
नागपूर येथे पत्रकार परिषद
नागपूर – कोणत्याही राज्यात ‘ड्रग्ज’वर (अमली पदार्थांवर) कारवाई झाली, तसेच मोठा साठा पकडल्यानंतर ‘साठा गोव्यात जात होता’, असे सांगितले जाते. यामुळे गोव्याची नाहक अपर्कीती होत आहे. गोवा म्हणजे काय ‘ड्रग्ज’चे मार्केट आहे का ?, असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पपत्राविषयी माहिती देण्यासाठी ते येथे आले असता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुढे म्हणाले की, अमली पदार्थ विक्रेता (पेडलर) आणि वापरकर्ते दोघांनाही लक्ष्य करून कठोर कारवाई केल्याने अमली पदार्थांच्या तस्करीला आळा बसला आहे. माझ्या कार्यकाळातच ‘पेडलर’ आणि तस्कर यांवर धाडी घालण्यात आल्या. अनेक छोट्या छोट्या ‘ड्रग्ज पेडलर्स’ना कारागृहात डांबण्यात आले आहे. राज्य सरकारचे अमली पदार्थांविरुद्ध शून्य-सहिष्णुतेचे धोरण आहे आणि गोवा पोलिसांनी चालू केलेल्या कारवाईमुळे राज्यात अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे अल्प झाले आहेत.
‘मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्यास आणखी २ वर्षे लागतील. या महामार्गाचे कोकणातील, तसेच गोव्यातील काही भागाचे काम अजून चालू आहे. त्यासाठी किमान २ वर्षे लागतील. भाजपने वर्ष २०१४ आणि २०१९ च्या संकल्पपत्रातील ९५ टक्के आश्वासने पूर्ण केली आहेत’, असेही ते म्हणाले.