काय करायचे ? काय करायचे नाही ? याविषयी दक्ष रहा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

  • लोकसभा निवडणूक – २०२४

  • सिंधुदुर्ग क्षेत्रीय अधिकारी आणि पोलीस क्षेत्रीय अधिकार्‍यांची आढावा बैठक

रत्नागिरी (जिमाका) – काय करायचे ? आणि काय करायचे नाही ? याविषयी सर्वांनी दक्ष रहावे, त्याचसमवेत दिलेले दायित्व एकमेकांच्या समन्वयाने पार पाडावे, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी केली.
राजापूर येथील आबासाहेब मराठे ऑर्ट्स ॲण्ड न्यू कॉमर्स, सायन्स कॉलेज मधील इनडोअर स्पोर्ट स्टेडियममध्ये सिंधुदुर्गमधील विधानसभा मतदार संघनिहाय क्षेत्रीय अधिकारी आणि पोलीस क्षेत्रीय अधिकारी यांची जिल्हाधिकार्‍यांनी आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सिंधुदुर्गचे अपर  जिल्हाधिकारी रवि पाटील आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी संगणकीय प्रणालीद्वारे सविस्तर माहिती दिली. क्षेत्रीय अधिकार्‍यांचे कार्य आणि दायित्व यात विशेषत: मतदान पूर्व आणि मतदान दिवशीचे दायित्व यांचा समावेश होता. मतदान केंद्रावर योग्य निवडणूक व्यवस्थापन असल्याची सुनिश्चिती, त्याचसमवेत अश्वासित सुविधांची खात्री करणे, रॅम्प, पिण्याचे पाणी, पुरेसे फर्निचर, योग्य प्रकाश व्यवस्था, विद्युत व्यवस्था, प्रसाधनगृहे, मतदान पूर्व संध्येचे दायित्व आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ‘‘मतदारांना ‘व्होटर इन्फॉरमेशन स्लीप’ अर्थात् मतदार चिट्टीचे वाटप बिएलओमार्फत पूर्ण करावे. याचे वाटप झाले की नाही, याविषयीही खातरजमा करावी. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांनी याविषयी दक्षता घेऊन कार्यवाही करावी. दिलेले काम समन्वयाने चोखपणे पूर्ण करण्यासाठी निवडणूक विषयक साहित्याचे वाचन करावे.’’