संपादकीय : पुतिन यांचा विजय !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

रशियामध्ये १७ मार्च या दिवशी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमिर पुतिन यांनी मोठा विजय मिळवला आहे. रशियाची सत्ता पुन्हा एकदा पुतिन यांच्या हाती आली असून ते वर्ष २०३० पर्यंत देशावर राज्य करतील. पुतिन यांना जवळपास ८८ टक्के मते मिळाली. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचा हा पाचवा कार्यकाळ असेल. आतापर्यंत ते एकदाही निवडणूक हरलेले नाहीत. विजयानंतर एका मुलाखतीत पुतिन म्हणाले, ‘‘रशियाला घाबरवले जाऊ शकत नाही किंवा आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. आता रशिया आणखी शक्तीशाली आणि प्रभावशाली होईल. जर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैनिकी संघटना असणारी नाटो आणि रशिया आमनेसामने आले, तर जग तिसर्‍या महायुद्धापासून एक पाऊल दूर असेल. मला असे वाटत नाही की, कुणाला असे काही हवे असेल.’’ चीनविषयीच्या संबंधांवर पुतिन म्हणाले की, जागतिक स्तरावर रशिया आणि चीन दोघांचे समान हित आहे. हा एक योगायोग आहे. पुढच्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील संबंध अधिक भक्कम होतील. ‘जर भविष्यात चीन आणि भारत यांच्यात युद्ध झाले, तर रशिया कुणाच्या बाजूने उभा राहील ?’, हा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो. रशिया आणि भारत जुने मित्र आहेत. अनेक अडचणींच्या काळात जगाचा विरोध पत्करून रशियाने भारताला साहाय्य केले आहे. चीनशी मैत्री ही रशियाची अगतिकता आहे; कारण अमेरिका रशियाला पाण्यात पहातो. अमेरिकेला धडा शिकवायचा असेल, तर रशियाला शक्तीशाली चीनला जवळ करावेच लागेल. त्यामुळे ‘रशिया आणि चीन यांच्या वाढत्या संबंधांचा भारतावर काय परिणाम होईल ?’, हे सध्या सांगणे कठीण आहे. येणार्‍या काळात भारताला याचे उत्तर मिळेल.

फेब्रुवारी २०२२ मध्ये पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण केले. पाश्चात्त्य देशांनी युक्रेनला साहाय्य केले आणि गेल्या २ वर्षांपासून हे युद्ध चालू आहे. पुतिन यांनी या काळात अनेक वेळा अण्वस्त्र आक्रमणाची धमकी दिली आहे. ३ मार्च २०२४ या दिवशी पुतिन यांची एक मुलाखत सरकारी माध्यमांमध्ये प्रसारित झाली होती. यामध्ये पुतिन धमकी देतांना म्हणाले होते की, जर रशियाच्या सार्वभौमत्वाला कोणत्याही प्रकारचा धोका असेल, तर आम्ही अण्वस्त्रांचा वापर करण्यास सिद्ध आहोत. यावरून पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना अणूयुद्ध करण्याची एकप्रकारची धमकीच दिली होती. रशियाकडे ‘फादर ऑफ ऑल बाँब्स’ म्हणजे अत्यंत विनाशकारी बाँब असल्यामुळे अनेक देशांच्या उरात धडकी भरली आहे. पुतिन निवडून आल्यानंतर ‘ते सत्तेचा वापर युक्रेन युद्धासाठी करतील’, असे अनेकांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे ‘पुतिन यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम रहावे’, असेही अनेकांचे म्हणणे आहे. ‘पुतिन हे सैन्याला बळकट करतील आणि नवीन भरती मोहीम चालू करतील’, असाही मतप्रवाह आहे. रशियातील सामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. ‘प्रचंड विजयाने प्रोत्साहित झालेले राष्ट्राध्यक्ष पुतिन कदाचित् नवीन युद्धमोहीम चालू करू शकतात’, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याच वेळी ‘पुतिन त्यांच्या विजयानंतर नवीन आर्थिक पावले उचलू शकतात’, असा विश्वास अनेकांना आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ञ प्रा. नीना ख्रुश्चेवा म्हणाले की, निवडणुका जिंकल्यानंतर पुतिन सैनिकी कारवाईचा वेग वाढवणार आहेत.

पुतिन यांच्यावरील आक्रमणे !

रशियामध्ये विरोधी कार्यकर्ते आणि युद्ध टीकाकार यांच्यावरील दडपशाही अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यांनी पुतिन यांना विरोध केला किंवा करतात त्यांना पुतिन यांनी कारागृहात डांबले आहे. असे प्रकार आणखी वाढीस लागतील. तज्ञांच्या मते पुतिन पाचव्यांदा निवडून आले आहेत, तर त्याचे परिणाम भारतावरही होणार आहेत. अमेरिकेला शह देण्यासाठी अजून बळकटी मिळेल. रशियातील सर्व कायदेशीर यंत्रणांना रशियाविरोधी युद्धात सहभाग घेणार्‍यांची ओळख पटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुतिन यांनी या वेळी प्रतिबंधित रशियन स्वयंसेवी कोरचा (आर्.वी.सी.चा) उल्लेख केला. या कोरमध्ये केवळ २ सहस्र ५०० सदस्य आहेत. त्यांना देशाबाहेर काढले जाईल. रशियात मृत्यूच्या शिक्षेचे प्रावधान नाही; पण फितुरांना तीच वागणूक दिली जाईल, जी युद्धाच्या मैदानात दिली जाते. पुतिन यांनी प्रतिबंधित रशियन स्वयंसेवी कोरला आतंकवादी संघटना ठरवले आहे.

पुतिन यांचे इतके शत्रू आहेत की, वैयक्तिक सुरक्षा असूनही त्यांच्यावर ४३ वेळा आक्रमण करण्याचे प्रयत्न झाले आहेत. असे म्हटले जाते की, वर्ष २००० मध्ये पुतिन यांनी रशियाच्या संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडले, तेव्हा रशियन माफियांनी त्यांच्यावर आक्रमण केले होते. या वर्षी उझबेकिस्तान दौर्‍यावर असतांना पुतिन यांच्यावर आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. यासह पुतिन यांच्या चारचाकी गाडीजवळ रिमोट कंट्रोलद्वारे बाँबस्फोट करण्यात आला, ज्यात त्यांचे अनेक साथीदार मारले गेले; मात्र पुतिन या सर्व आक्रमणांतून बचावले. वर्ष २००२ मध्ये याल्टा येथे प्रवास करतांना पुतिन यांना देण्यात आलेल्या ब्रेडमुळे विषबाधा झाली होती; परंतु पुतिन बचावले होते. अनेकवेळा स्नायपर, बाँबस्फोट आणि आत्मघातकी आक्रमणांचा सामना करणारे पुतिन प्रत्येक वेळी बचावले आहेत.

रशिया-भारत यांचे दृढ संबंध !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारामध्ये गेल्या ३ वर्षांत विक्रमी वाढ झाली आहे. उभय देशांमध्ये तब्बल ५०० हून अधिक टक्क्यांनी झालेल्या व्यापार वृद्धीमुळे रशिया आता भारताचा ७ वा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार झाला आहे. रशिया-युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे पश्चिमी देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले असतांना भारताचे मात्र रशियाशी व्यापारी संबंध वृद्धींगत झाल्याने याकडे विशेषत्वाने पाहिले जात आहे. भारताने रशियाला भरघोस साहाय्य केल्याने रशिया भारतावर प्रसन्न आहे. त्यामुळे प्रत्येक दौर्‍याच्या वेळी पुतिन अथवा रशियाचे मंत्री भारतासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करत असल्याचे दिसून येते. भारताने आतापर्यंत रशियाकडून कच्चे तेल आणि संरक्षणविषयी शस्त्रास्त्रे यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करून रशियाची अर्थव्यवस्था बळकट केली आहे. आताही ब्रह्मोस क्षेपणास्त्र बनवण्यात भागीदारी, अणूऊर्जा, कच्चे तेल, गॅस, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा अनेक वस्तूंची रशिया भारताला मोठ्या प्रमाणात निर्यात करत आहे. या सर्व गोष्टींचा आढावा घेता पुतिन रशियाचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणे भारताच्या हिताचे आहे.

जागतिक स्तरावरील राजकारण पहाता पुतिन पुन्हा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येणे, हे भारताच्या हिताचे !