विमानतळाच्या क्षमतेपेक्षा २८ टक्के अधिक प्रवासी वाहतूक !
पुणे – पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होत आहे. टर्मिनलची प्रवासी वहनक्षमता वर्षाला सुमारे ७१ लाख इतकी आहे; मात्र वर्ष २०२३ मध्ये ८० लाखांहून अधिक प्रवासी वाहतूक झाली. क्षमतेपेक्षा २८ टक्के अधिक प्रवासी वाहतूक होत असल्याने त्याचा प्रवासी सुविधांवर परिणाम होत आहे. विमानतळाच्या बाहेर ओला-उबेरच्या वाहनांना पिकअपसाठी अनुमती नसल्याने टर्मिनलच्या आवारात गर्दी होत आहे. ‘चेक इन काऊंटर’, ‘सिक्युरिटी चेक’ यांसाठी रांगा लागत आहेत. ‘बॅगेज स्क्रीनिंग’ला (बॅगा पडताळण्यासाठी) विलंब होत आहे. ‘पॅसेंजर लाउंज’मध्ये होणारी गर्दी, प्रवाशांना बसण्यासाठी तोकडी आसन व्यवस्था, स्वच्छतागृह लवकर उपलब्ध न होणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच विमान रहित झाले, विलंबाने आले, तर अन्य सुविधांवरसुद्धा याचा परिणाम होत आहे. पुणे विमानतळावरून प्रवास करणार्यांच्या संख्येत वाढ झाली; मात्र त्या तुलनेत सुविधांमध्ये वाढ झालेली नाही. विमान आस्थापन नफेखोरी वाढवण्यासाठी विमानांची संख्या वाढवत आहेत. यातून विमानतळाचे उत्पन्नही वाढते; मात्र प्रवाशांना मिळणार्या सुविधांकडे ना विमानतळ प्रशासन लक्ष देत आहे, ना विमान आस्थापने ! सामान्य प्रवासी मात्र गैरसोयींचा सामना करत आहेत. (स्वतःच्या लाभासाठी प्रवाशांची गैरसोय करणार्या स्वार्थी विमान आस्थापनांना प्रवाशांनीच सनदशीर मार्गाने जाब विचारणे आवश्यक ! – संपादक)
याविषयी पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले की, आम्ही ‘चेक इन’साठी ‘डीजी यात्रा’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. ‘क्षमतेपेक्षा अधिक विमानांचे उड्डाण केल्यावर त्याचा प्रवासी सेवेवर नक्कीच विपरीत परिणाम होतो. मुंबईत ‘डीजीसीए’ने (‘नागरी उड्डाण महासंचालका’ने) विमानांचे उड्डाण अल्प करण्याचा निर्णय घेतला, तसा पुण्यातसुद्धा घेतला पाहिजे’, असे हवाई वाहतूकतज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी मत व्यक्त केले.