आज ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिन (दिनांकानुसार)’ आहे. त्या निमित्ताने…
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवी मनाला ‘महाकवीचा घाट’ आणि ‘पल्लेदारपणा’ हे गुण निसर्गाने सढळ हाताने दिले. सावरकर यांच्या कवितेला कर्तेपणाची अनन्यसामान्य जोड आहे. त्यांच्या कवितेत आढळणारा ‘वीररस’ त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून आला आहे. त्यांच्यातील क्षात्रतेजाचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात आपल्याला ठिकठिकाणी आढळते. दुर्दम्य आशावाद आणि विजिगीषू वृत्तीने त्यांचे काव्य नटलेले आहे. त्यांच्या लेखनात उत्कट ‘धर्मभावना’ आणि ‘राष्ट्रभावना’ एकवटलेली दिसून येते. त्यामुळे त्यांचे प्रत्येक काव्य, म्हणजे ‘राष्ट्रतीर्थ’ झाले आहे. वीररस, करुणरस आणि भक्तीरस यांचा त्रिवेणी संगम सावरकर यांच्या काव्यात आढळतो. सावरकर यांची काव्यवाटिका प्रयाग क्षेत्रासारखी पवित्र आहे. सावरकर यांनी जवळजवळ सर्व प्रकारच्या वृत्तांमध्ये काव्यरचना केली आहे. एवढेच नाही, तर त्यांनी महाकाव्याची सजावट करण्यासाठी नवे ‘वैनायक वृत्त’ (काव्यातील एक प्रकार) निर्माण केले.
‘हिंदुस्थान हिंदूंचाच राहिला पाहिजे’, या ठाम विचाराने ‘एकतागान’ची निर्मिती
सावरकर यांची राजकीय मतप्रणाली सर्वज्ञात आहे. ‘हिंदुस्थान हा अविभाज्य असून तो हिंदूंचा आहे, हिंदूंचाच राहिला पाहिजे’, हा त्यांचा मूलमंत्र सर्वकालिक आहे. त्यांची राष्ट्रीय वृत्ती जिवंत आणि निर्भेळ असल्यामुळे त्यांच्या खासगी अन् सार्वजनिक जीवनात कुठेही विसंगती आढळत नाही. ‘देशातील हिंदू एकच आहे. तो जातीजातींमध्ये विभागला जाऊ शकत नाही’, हे त्यांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असतांना वर्ष १९२५ मध्ये हिंदूंचे ‘एकतागान’ या कवितेतून स्पष्ट शब्दांत सांगितला आहे. या कवितेतून व्यक्त केलेले विचार हे हिंदु सांस्कृतिक परंपरेची साक्ष देणारे आहेत. आद्यशंकराचार्य यांनी अन्नपूर्णादेवी स्तोत्र रचले. त्या स्तोत्रातील ‘माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः । बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ।।’ (अन्नपूर्णास्तोत्र, श्लोक १२ – अर्थ : देवी पार्वती माझी माता, देवाधिदेव महादेव माझे पिता, शिवभक्त माझे बांधव आणि तिन्ही भुवने माझा स्वदेश आहेत.) या पंक्तींचे स्मरण करून देणारी सावरकर यांची ‘हिंदूंचे एकतागान’ ही कविता आहे. या कवितेचा आरंभ त्याची साक्ष देतो.
तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधूबंधू ।
तो महादेवजी पिता आपुला चला तया वंदू ।।
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर (१३.२.२०२४)
१. सावरकर यांच्या कविता मराठी महाकाव्यात सर्वाेच्च स्थानी
सावरकर यांच्या काव्यवाटिकेत बोधपर लावणी आणि भावगीतांचे दर्शन आपल्याला होते. ‘कमला’, ‘गोमांतक’, ‘विरहोच्छ्वास’ आणि ‘महासागर’ या महाकाव्यांमध्ये स्वतंत्र कथानक, भव्यप्रसंग, तडफदार अन् उत्कट भावना, पल्लेदार कल्पना, उच्च-उदात्त हेतू असल्याने मराठी महाकाव्यात त्यांना सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरत नाही.
२. भेदरट काळजांना धीर आणि धीट काळजांना स्फूर्ती देणारे सावरकर यांचे भाषण
सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असतांनाची एक आठवण सांगतांना कवी साधुदास म्हणाले, ‘सावरकर भाषणासाठी उभे राहिले आणि बघता बघता त्यांनी श्रोत्यांच्या मनाची पकड घेतली. त्यांच्या मुद्रेत, अविर्भावात, वाक्योच्चारात किंबहुना प्रत्येक शब्दांत एक प्रकारचा जिवंत उमाळा आणि दुर्दम्य आवेश जाणवत होता. स्वदेशाभिमान, स्वराज्य प्रीती, राष्ट्रीय भावना इत्यादी कल्पना त्याकाळी मुग्धावस्थेत होत्या आणि त्या उघडपणे प्रकट करण्याचे धारिष्ट्य फारच थोडे वक्ते आणि लेखक यांना होते; तथापि या धाडसी विद्यार्थ्यांच्या अमोघ वक्तृत्वात त्या कल्पना सहज आणि जोरकस रितीने उमटून गेल्या की, व्याख्यानास उपस्थित असलेल्या एकूण एक विद्यार्थ्यांचे हृदय उचंबळून आले आणि कित्येकांच्या डोळ्यांतून तर आसवेच उभी राहिली. भेदरट काळजांना धीर आणि धीट काळजांना स्फूर्ती देणारे ते नादब्रह्म अखेर वातावरणात विलीन झाले; पण श्रोतृ समुहाची समाधी उतरण्यास फार वेळ लागला.’
या प्रसंगाचा दाखला देऊन कवी साधुदास म्हणतात, ‘या प्रसंगाने सावरकर ‘स्वातंत्र्यशाहीर’ आहेत, ही गोष्ट मला उमगून आली.’
३. इंग्रजांच्या राजवटीत स्वातंत्र्याचे ध्येय ठेवून वीरवृत्तीप्रधान कवनांची रचना करणारे स्वातंत्र्यवीर !
पोवाडे, लावण्या यांसारखी कवने रचणार्या कवीला ‘शाहीर’ हे संबोधन लावले जाते. वास्तविक शाहीर या शब्दाचा अर्थ व्यापक असून राष्ट्रीय किंवा वीरवृत्तीप्रधान कवने रचणारा असा आहे. इतिहासात अनेक शाहीर होऊन गेले. त्यांच्या कवनांमध्ये ओजस्विता आणि स्फूर्तीदायकता आढळत नाही. पेशव्यांच्या राजवटीत जे शाहीर होऊन गेले, त्यांची स्वातंत्र्याची आणि वीरवृत्तीची कल्पना ही मराठेशाहीपुरतीच मर्यादित होती. संपूर्ण हिंदुस्थान आणि त्याचे स्वातंत्र्य आपले ध्येय आहे, या कल्पनेला केंद्रस्थानी ठेवून इंग्रजांच्या राजवटीत राष्ट्रीय आणि वीरवृत्तीप्रधान कवनांची रचना करणारे म्हणून निर्विवादपणे आपण सावरकर यांचा उल्लेख करू शकतो.
४. प्रत्यक्ष रणांगणात उतरून शत्रूला आवाहन देत आत्मबल दाखवून देणारे शाहीर सावरकर !
सावरकर यांच्या जीवनातील कालखंडाकडे दृष्टीक्षेप टाकला की, आपल्या ध्यानात असे येते की, कुमारवयापासून ते अंदमानच्या कारागृहातून मुक्त होईपर्यंतच्या कालखंडात राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेली आणि स्वातंत्र्य लालसा उत्कटपणे व्यक्त करणारी अनेक कवने सावरकर यांच्या लेखणीतून साकारली गेली. त्या वेळी ते राष्ट्र कार्य करतच होते. ते करत असतांना त्यांनी ‘अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला मारील रिपू जगती असा कवन जन्मला ।’
असे कवन रचून त्यांनी स्वतःचे आत्मबळ व्यक्त केले आहे. ‘कोणताही आणि कसाही प्रसंग आला, तरी त्या प्रसंगासमोर हार मानणार नाही; कारण या भूतलावर मला मारणारा कोणताही शत्रू अजून जन्माला आला नाही’, असे सांगणारा स्वातंत्र्याचा शाहीर प्रत्यक्ष रणांगणात उतरून शत्रूला आव्हान देत आहे.
५. मृत्यूत्तर प्रवासासाठी भगवान श्रीकृष्णाच्या विश्वासावर सिद्ध असलेले सावरकर !
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमानात मरणोन्मुख शय्येवर पहुडले असतांना मृत्यूनंतरच्या जीवनातही आपल्याला कोणत्याही प्रकारचे भय वाटत नाही, याचे कारण सांगतांना ते म्हणतात…
‘स्मशानभूमीचा परतटप्रदेश जो अनोळखी तिथे सुखकर प्रवास करवि जे असे, असे ओळखीचे पत्र आम्हा जवळ त्या स्वये भगवान श्रीकृष्णाचे.’ मृत्यूनंतरच्या जीवनाचा आपल्याला परिचय नसतो. त्यामुळे परिचय नसलेल्या त्या प्रदेशात वावरतांना आपल्याला भीती वाटणार नाही. याचे कारण सांगताना सावरकर म्हणतात, ‘त्यांच्याकडे श्रीकृष्णाचे ओळखपत्र आहे.’
६. कवनांमधील विचार आचरणात आणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !
कोणताही शाहीर प्रत्यक्ष रणांगणावर उतरून लढत नसतो; पण सावरकर हे असे स्वातंत्र्यशाहीर आहेत, जे प्रत्यक्ष रणांगणात उतरून लढत आहेत. ते राष्ट्रीय कार्यकर्ते आणि राजकीय विचारवंत म्हणून जगमान्य झाले. त्यांच्या कवनांतून व्यक्त होणारे विचार त्यांनी स्वतःच्या आचरणात आणले. अशा प्रकारे स्वातंत्र्यशाहीर सावरकर ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
त्यांच्या अंतरंगात खळबळणारी राष्ट्राच्या स्वातंत्र्याची, अखंडत्वाची आणि उत्कर्षाची लालसा अखेरच्या श्वासापर्यंत जराही उणावली कि कोमेजली नाही. त्यांचे संपूर्ण जीवन गंभीर आणि प्रशांत जलप्रवाहासारखे मार्गक्रमण करत असल्याचे आढळून येते.
७. मातृभूमीच्या विरहाने व्याकुळ होणारे कणखर स्वातंत्र्यवीर सावरकर !
हा स्वातंत्र्याचा शाहीर मातृभूमीचा विरह सहन करू शकत नाही. मातृभूमीच्या आठवणीने मानसिक आणि भावनिक दृष्ट्या कणखर असलेला स्वातंत्र्यवीर सागराकडे आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणतो,
‘ने मजसी ने । परत मातृभूमीला ।। सागरा प्राण तळमळला…’
८. सर्वांगाने मातृभूमीला संपूर्ण समर्पित होणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !
या स्वातंत्र्य शाहिराने त्यांचे मन, वाणी, कविता आणि सारे साहित्य मातृभूमीला समर्पित करतांना म्हटले, ‘हे मातृभूमी तुजला मन वाहियेले, वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले तूं तेचि अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तुचि अनन्य झाला.’
९. ‘हिंदुस्थान’ हे सर्वस्व असणारे आणि त्याच्याशी पूर्णपणे एकरूप झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर !
जगात अनेक देश आहेत; तरीसुद्धा आपला देश या स्वातंत्र्य शाहिराला अत्यंत प्रिय आहे. एवढेच नाही, तर आपला देशच या शाहिराला स्वतःचे पंचप्राण वाटतो.
‘सकल जगामधि छान अमुचा प्रियकर हिंदुस्थान ।
केवळ पंचप्राण अमुचा सुंदर हिंदुस्थान ।।’
१०. देश रक्षणासाठी प्राण देण्याची आणि घेण्याची सिद्धता असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !
आपल्या देशावर जर कुणी आक्रमण केले, तर या देशाच्या रक्षणासाठी शत्रूचे प्राण घेण्यास तत्पर असलेला हा शाहीर आक्रमकांना चेतावणी देतो,
‘सत्ता आपली, मत्ता अपुली ही रत्नांची खाण ।
कुणी हिरावून घेऊ बघता, रक्षू घेऊनी प्राण ।।’
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१३.२.२०२४)
पुढील पिढीला आवाहनक्षात्रतेजाने तळपणारा हा शाहीर ‘अखिल-हिंदु-विजय-ध्वज अविरतपणे फडकत रहावा, यासाठी आपल्या नंतरच्या पिढीने सुद्धा स्वतःचे सर्वस्व मातृभूमीच्या चरणी समर्पित करावे’, असे आवाहन करतो. अशा या ‘स्वातंत्र्य शाहिरा’ने २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी आयुष्यभर राष्ट्रासाठी जेवढे करता येईल तेवढे कार्य करून, अत्यंत समाधानाने अन्नत्याग करून स्वेच्छेने आपल्या जीवनाला पूर्णविराम दिला. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून लेखणीला विराम देतो ! – श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१३.२.२०२४) |