दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कुवेतहून भारतात आलेल्या ३ आरोपींना जामीन !; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यावर गुन्हा नोंद !…

कुवेतहून भारतात आलेल्या ३ आरोपींना जामीन !

मुंबई – कुवेतमधून बोटीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना मुंबईतील न्यायालयाने जामीन संमत केला. आरोपीविरोधात संशयास्पद पुरावे किंवा आक्षेपार्ह आढळलेले नाही. तमिळनाडूचे नित्सो डिट्टो, विजय विनय अँथनी आणि सहयोग अनीश हे कुवेतला नोकरीनिमित्त गेले होते; परंतु मालकाने दिलेल्या वाईट वागणुकीमुळे त्यांना तेथून पळून यावे लागले.


अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यावर गुन्हा नोंद !

अशांना कठोर शिक्षाच करायला हवी !

नागपूर – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या रोहित कनोजिया याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अत्याचार करून त्याने तिच्या आई-वडिलांना धमकी दिली की, तुमची मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मी तिला उचलून नेईन. अत्याचाराविषयी सांगितल्यास आई-वडिलांना मारून टाकण्याचीही धमकी दिली. आरोपीचा शोध चालू आहे.


चोरीचा दूरचित्रवाणी संच विकणारे दोघे अटकेत !

अशा चोरट्यांवर कारवाई व्हायला हवी ! त्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

नागपूर – चोरीचा दूरचित्रवाणी संच विकण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी कह्यात घेतले. या वेळी त्यांनी ४ ठिकाणी घरफोडी केल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून ४ लाख ७४ सहस्र रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. राहुल मानिकपुरी, अमर मिश्रा अशी आरोपींची नावे आहेत.


शिवनेरी बस अटल सेतूवरून धावणार !

मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवनेरी बस देशातील सर्वाधिक लांबीच्या अटल सेतूवरून धावेल, असा निर्णय दिला. पुणे-मंत्रालय, स्वारगेट-दादर अशा स्वरूपात शिवनेरी २० फेब्रुवारीपासून मार्गस्थ होणार आहे.


आरक्षणासाठीचे अधिवेशन म्हणजे झुलवण्याचा प्रकार ! – राज ठाकरे

राज ठाकरे

मुंबई – मराठा आरक्षणासाठीच्या अधिवेशनातून काहीही हाताला लागणार नाही. हा भुलवण्याचा आणि झुलवण्याचा प्रकार आहे, असे मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. २० फेब्रुवारी या दिवशी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन होणार आहे.