पिंपरी (जिल्हा पुणे) – देश पालटतोय, त्याची अनुभूती येत आहे. ‘जय श्रीराम’ची घोषणा दिला जात आहे. श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त २२ जानेवारीपासून देशभरात भक्तीची लाट आली आहे, ती यापुढेही कायम रहावी. अयोध्येत श्रीरामललाचे मंदिर झाले. याच मार्गाने पुढे जात काशी-मथुरेतही मंदिर उभारण्याचा आमचा संकल्प असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य भैय्याजी जोशी यांनी चिंचवड येथे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायक थोरात यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त चिंचवडमध्ये अभिष्टचिंतन सोहळा झाला. या वेळी ते बोलत होते. जोशी आणि संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते थोरात यांचा सत्कार करण्यात आला. प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडगावकर, प्रांत प्रचारक यशोधन वाळिंबे, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अमोल थोरात आणि थोरात परिवाराच्या आप्तेंष्टासह संघाचे पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी, स्वयंसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जोशी पुढे म्हणाले की, ‘मंदिर वही बनायेंगे’ची घोषणा देत रामभक्तांनी बाबरी ढाचा हटवला. ५०० वर्षे हृदयाला टोचणारा काटा दूर करून आदर्शवत् प्रेरणास्थान निर्माण केले. देशात मंदिरांची कमतरता नाही; मात्र अयोध्येतील श्रीराममंदिर हे सर्वार्थाने राष्ट्र मंदिर आहे. समाजाचा सामूहिक आनंद, सामूहिक शक्ती निर्माण करण्याच्या प्रयत्नाचा तो एक भाग आहे. त्या माध्यमातून देशाचे सातवे सोनेरी पान लिहिण्याचे भाग्य तुम्हा-आम्हाला मिळाले आहे.