समुद्री दरोडेखोरांना खपवून घेतले जाणार नाही ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

‘आय.एन्.एस्. संधायक’ कार्यान्वित

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) – भारतीय नौदल इतके सशक्त झाले आहे की, आपण हिंदी महासागर आणि हिंद-प्रशांत क्षेत्रांत सुरक्षेच्या संदर्भात पहिल्या स्थानावर पोचलो आहोत. हिंदी महासागरात एडनचे आखात आणि गिनीचे आखात आहे. ज्याद्वारे मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय व्यापार होतो. या ठिकाणी सर्वांत मोठा धोका समुद्री दरोडेखोरांचा (चाच्यांचा) आहे. आम्ही अलीकडेच ८० जणांची दरोडेखोरांपासून सुटका केली आहे. ‘या दरोडेखोरांना खपवून घेतले जाणार नाही’, असा भारताचा संकल्प आहे, असे विधान भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. येथे भारतीय नौदलाची नवी युद्धनौका ‘आय.एन्.एस्. संधायक’ ही कार्यान्वित करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर्. हरि कुमार उपस्थित होते.

कशी आहे  ‘आय.एन्.एस्. संधायक’ ?

छायाचित्र सौजन्य : Facebook Indian Navy

‘आय.एन्.एस्. संधायक’ ही युद्धनौका विशेषतः पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. ११ सहस्र कि.मी.च्या अंतरात ती पाळत ठेवणार आहे. यावर बोफोर्स तोफा बसवण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास चेतक हेलिकॉप्टरही त्यावर तैनात करता येऊ शकतो. ही युद्धनौका ‘मेसर्स गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स’ कोलकाता या आस्थापनाने बनवली आहे. भारतीय नौदलासाठी अशा ४ युद्धनौका बनवण्यात येणार आहेत. यांतील ही पहिली युद्धनौका आहे.