अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन
अयोध्या – श्रीरामलला विराजमान झाले असून त्यांचे अलौकिक दर्शन घेण्यासाठी लक्षावधी हिंदू अयोध्येत येत आहेत. राममय झाल्याची अनुभूती त्यांना व्हावी, म्हणून संपूर्ण अयोध्यानगरी दैवी प्रसंगांनी, तसेच अत्यंत सुंदर पद्धतीने नटवण्यात आली आहे.
पक्षांच्या घरट्याप्रमाणे झाडांवर दिव्यांची मांडणी !
झाडांवर ज्याप्रमाणे सुगरण पक्षांची घरटी लटकत असतात, त्याप्रमाणे अयोध्यानगरीच्या मुख्य मार्गावरील झाडांवर आकर्षक पद्धतीने दिवे लावण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी झाडांवरील दिवे लावल्यावर रस्त्यावर प्रकाश पडतो आणि या दिव्यांमुळे झाडेही आकर्षक दिसतात. अयोध्यानगरीच्या मुख्य मार्गावरील झाडांवर अशा प्रकारे दिवे लावण्यात आले आहेत.
प्रदक्षिणा मार्गावर साकारण्यात आलेले रामायण लक्षवेधक !
अयोध्यानगरीतील मुख्य मार्गांवरील पादचारी मार्गाच्या भिंतींवर शिलाचित्रांप्रमाणे रामायणातील प्रसंग साकारण्यात आले आहेत. ही चित्रे अतिशय आकर्षक असून या चित्रांकडे पाहिल्यावर रामायणाच्या कथा डोळ्यांपुढे उभ्या रहातात. यामध्ये हनुमानाचे समुद्र उड्डाण, सीताहरण, श्रीरामाने केलेले धनुष्यभंजन आदी चित्रांद्वारे संपूर्ण रामायण साकारण्यात आले आहे.
फुलांनी आकर्षकरित्या सजवलेली भव्य प्रवेशद्वारे !
श्रीरामाच्या मंदिराकडे जाणारी सर्व द्वारे आकर्षक पद्धतीने फुलांनी सजवण्यात आली आहेत. यामध्ये मुख्य प्रवेशद्वार भव्य असून त्यावर भक्तांचे स्वागत करण्यात आले आहे. अन्य एका प्रवेशद्वारावर एका बाजूला ५ आणि दुसर्या बाजूला ५ अशा पद्धतीने हत्तीच्या १० मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. या सर्व मूर्ती फुलांनी सजवण्यात आल्या आहेत.