भारतावर आरोप करून चीनचा स्वतःच्या घरालाच आग लावण्याचा प्रकार !

‘केवळ आशिया खंडातीलच नव्हे, तर जगातील असंस्कृत देश म्हणजे चीन ! संपूर्ण जग आता आधुनिक तंत्रज्ञान युगात वावरत आहे. ‘सभ्य, सुविद्य, सुसंस्कृत समाज असलेला देश म्हणून आपली जगात ओळख व्हावी’, ही प्रत्येक देशाची महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. मानवतेचा श्रेष्ठ संदेश देण्याचा प्रयत्न जगातील श्रेष्ठ आणि बलवान देशांनी स्वतःची कृती आणि वर्तन यांद्वारे जगाला द्यायचा आहे. साम्राज्य विस्तार आणि स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी जो देश प्रयत्न करतो, त्याच्यात आणि दरोडेखोर यांच्यात कोणताही भेद आहे, असे म्हणता येणार नाही.

श्री. दुर्गेश परुळकर

१. बलवान राष्ट्राचे कर्तव्य

आजच्या आधुनिक जगातही अनेक देश अत्यंत मागास, गरीब आणि दुबळे आहेत. अनेक देशांना स्वतःच्या प्रजेला प्राथमिक सुविधा सुद्धा उपलब्ध करून देता येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, आर्थिक पाठबळ नाही, अत्यंत अल्प लोकसंख्या, भौतिक सुविधांचा अभाव, कुशलता आणि नैपुण्य नसलेला सामान्य बुद्धिमत्तेचा समाज या अन् अशा विविध गोष्टींनी त्रस्त असलेले अनेक देश जगात आहेत. सुविद्य सुसंस्कृत देशांनी अशा देशांना सुशिक्षित आणि सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांचा आर्थिक अन् शैक्षणिक बौद्धिक विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. ‘आपण या आधुनिक जगात सुसंघटित मानवी समाज निर्माण करण्यासाठी वातावरण निर्माण केले पाहिजे आणि ते आपले दायित्व आहे’, असे बलवान राष्ट्राला वाटले पाहिजे.

२. चीनचा चुकीचा हेतू आणि त्याची खरी ओळख !

चीन या देशाकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे. पैसाही आहे; पण प्रामाणिकपणा, परोपकारी वृत्ती, निरलस निरपेक्ष भावना, अशा सद्गुणांचा अभाव आहे. गरीब देशांना आर्थिक साहाय्य करतांना त्या देशाची सर्वांगीण उन्नती व्हावी, या सद्भावनेने चीन कोणत्याही देशाला साहाय्य करत नाही. ‘आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या देशांना आर्थिक साहाय्य करायचे. सर्व प्रकारच्या सुख, सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. त्या निमित्ताने त्या देशाला कर्जबाजारी करायचे. नंतर ते कर्ज फेडण्याची क्षमता त्या देशांमध्ये निर्माण होऊ द्यायची नाही. त्या देशावर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करायचे आणि मग योग्य संधी साधून त्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे स्वतःच्या कह्यात घेणे’, हा दुष्ट हेतू मनात बाळगून चीनने अनेक देशांना साहाय्य केले आहे. त्यामुळे चीन हा एक लबाड देश असून तो दरोडेखोर आहे. सभ्यतेचा बुरखा पांघरून जगात वावरणारा चीन भारताला अपकीर्त  करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा अनुभव आपण वारंवार घेतला आहे.

‘आतंकवाद्यांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारा देश’ म्हणून चीन जगात ओळखला जातो. भारताला सुखाने जगू न देण्याचा विडा चीनने उचलला आहे. चीन अनेक वर्षे सरहद्दीवर तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याचे काम करत आला आहे. संपूर्ण दक्षिण आशियावर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणारा देश ही चीनची खरी ओळख आहे.

भारताने मात्र प्रारंभीपासूनच ‘एक एका साह्य करूं । अवघे धरू सुपंथ’, या संत तुकाराम महाराजांच्या वचनाला आपल्या राष्ट्रीय जीवनात अनन्यसाधारण महत्त्व दिले. त्यानुसार बिकट काळात भारताने साहाय्याचा हात सर्वच राष्ट्रांना दिला आहे.

३. मालदीवला भारताने महत्त्वाच्या क्षणी आणि वेळोवेळी केलेले साहाय्य

मालदीवचे तत्कालीन राष्ट्रपती म्हणून मौमून अब्दुल गयूम यांनी वर्ष १९७८ ते २००८ अशी ३० वर्षे राज्यकारभार केला. मालदीवचा नागरिक असलेला व्यापारी अब्दुल्ला लुथुफी याने त्यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी प्रयत्न केला; पण त्याला यश आले नाही. मौमून गयूम यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी अब्दुल्ला लुथुफी या व्यापार्‍याने श्रीलंकेच्या ‘पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ इलम’ या आतंकवादी संघटनेचे साहाय्य घेतले.

मालदीवचे राष्ट्रपती मौमून अब्दुल गयूम ३ नोव्हेंबर १९८८ या दिवशी भारताच्या दौर्‍यावर जाणार होते. तोच दिवस गयूम यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी श्रीलंकेच्या आतंकवादी संघटनेने निश्चित केला. तथापि भारताचे तत्कालीन पंतप्रधान त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार त्या दिवशी उपलब्ध नव्हते. म्हणून मालदीवच्या राष्ट्रपतींचा भारताचा दौरा रहित करण्यात आला. तरीही आतंकवादी संघटनेने कारवाई करण्याचे रहित केले नाही. श्रीलंकेच्या आतंकवाद्यांनी मालदीव सरकारच्या सर्व सरकारी कार्यालयांवर ताबा मिळवला. आतंकवाद्यांच्या तावडीतून राष्ट्र आणि राष्ट्रपती या सर्वांचीच मुक्तता करण्याच्या हेतूने मालदीवने पाकिस्तान, सिंगापूर, इंग्लंड या देशांकडे साहाय्य मागितले. यांपैकी कोणताही देश साहाय्य करण्यासाठी पुढे सरसावला नाही. इंग्लंडने मालदीवला ‘भारताकडून साहाय्य घ्यावे’, असे सुचवले आणि त्याप्रमाणे साहाय्य मागितले. भारताने तात्काळ साहाय्य करत असल्याचे मालदीवला कळवले.

भारताने स्वतःचे सैन्यदल मालदीवच्या रक्षणार्थ पाठवले. भारतीय सैन्य दल काही घंट्यातच मालदीवच्या भूमीवर उतरले. भारतीय वीर सैनिकांनी अनेक आतंकवाद्यांना पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या, तर काही आतंकवाद्यांना ठार केले. मालदीवचे राष्ट्रपती आणि त्यांचे सरकार सुरक्षित राहिले. अशा प्रकारे गयूम यांची सत्ता उलथून पाडण्याचे स्वप्न रसातळाला गेले. अशा बिकट काळात चीन मालदीवच्या पाठीशी उभा राहिला नाही. संकटकाळात जो साहाय्याला धावून येतो, त्याला ‘सज्जन’ म्हणतात. दुसर्‍याच्या संकटात स्वतःचा लाभ करून घेण्यासाठी जो प्रयत्न करतो, त्याला ‘लबाड’ आणि ‘असंस्कृत’ म्हणतात. चीन लबाड आणि असंस्कृत आहे; म्हणून चीनने भारताशी कोणत्याही प्रकारची स्पर्धा करण्याचा प्रयत्न करू नये.

वर्ष २०२० मध्ये संपूर्ण जगाला कोरोना महामारीने भंडावून सोडले. अशा बिकट काळात चीन मालदीवच्या साहाय्याला गेला नाही; पण भारताने त्या बिकट काळात मालदीवला २५ कोटी डॉलरचे साहाय्य केले. मालदीवच्या एका प्रकल्पाला आग लागल्यामुळे तिथे मोठ्या  पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला. अशा बिकट काळात भारताने मालदीवला जीवन देऊन त्याचे जीवन वाचवले. अशा प्रकारे अनेक वेळा भारत केवळ मालदीवला नव्हे, तर अनेक देशांना बिकट वा संकट काळात लागेल ते साहाय्य केले आहे.

४. भारताचे मालदीवशी मैत्रीपूर्ण संबंध ही चीनची पोटदुखी !

भारताविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निवडणुकीत विजय संपादन करून राष्ट्रपती पद प्राप्त करून मालदीवमध्ये स्वतःची सत्ता स्थापन करणारी प्रत्येक व्यक्ती भारताच्या भेटीला येते. भारताशी असलेले मालदीवचे मैत्रीपूर्ण संबंध ही चीनची पोटदुखी आहे. ती सहन न झाल्यामुळे चीनने अत्यंत स्वार्थापोटी मालदीवची अर्थव्यवस्था स्वतःच्या कह्यात घेण्याच्या हेतूने शिरकाव केला आहे. स्वतःची राक्षसी महत्त्वाकांक्षा दडवून चीन भारताला आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करत आहे. चीनची ही लबाडी संपूर्ण जगाने ओळखली आहे. संपूर्ण जगात प्रिय होत असलेला भारत चीनला पहावत नाही. चीनची  होणारी ही तडफड विकृत स्वरूपामध्ये बाहेर येत आहे. त्यात चीन सुसंस्कृत भारतावर खोटे आरोप करून स्वतःचे नाक स्वतःच्या हातानेच कापून घेत आहे.

५. पंतप्रधानांनी मालदीवला दिलेली वागणूक योग्यच !

मालदीवच्या विद्यमान राष्ट्रपतींनी त्यांची परंपरा बाजूला सारून भारताशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे कोणतेही औचित्य दाखवले नाही. भारताविषयी वैरभाव व्यक्त करण्याची आगळीक मालदीवमधील ३ मंत्र्यांनी केली. भारताच्या पंतप्रधानांविषयी अपशब्द वापरून त्यांना अपमानित केले. स्वत्व आणि स्वाभिमान बाळगणे, हा अपराध नाही; कारण नसतांना दुसर्‍याच्या स्वाभिमानाला दुखावण्याचा प्रयत्न करणे, हे सभ्यतेचे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. भारताच्या पंतप्रधानांनी स्वतःच्या देशाचा मान राखण्यासाठी मालदीवशी असलेले संबंध तोडले आणि मालदीवला करण्यात येणारे सर्व प्रकारचे साहाय्य करण्याचे थांबवले.

धटासी आणावा धट । उत्धटासी पाहिजे उत्धट ।
खटनटासी खटनट । अगत्य करी ।।

– दासबोध, राजकारण निरूपण, समास ९ वा, ओवी ३०

असा उपदेश समर्थ रामदासस्वामी यांनी केला आहे. त्यानुसारच पंतप्रधान वागले. पंतप्रधानांच्या या प्रतिक्रियेच्या मागे मालदीवची बुद्धी ठिकाणावर यावी, हा सद्हेतू आहे.’

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१२.१.२०२४)