कोणत्याही युद्धात धर्मरथावर आरूढ असाल, तर पराभव अशक्य ! – प्रकाश एदलाबादकर, ज्येष्ठ साहित्यिक आणि अभ्यासक  

मार्गदर्शन करताना ज्येष्ठ साहित्यिक आणि अभ्यासक प्रकाश एदलाबादकर

नागपूर – कोणत्याही युद्धात जर तुम्ही धर्मरथावर आरूढ असाल, तर शत्रूकडून तुमचा पराभव होऊ शकणार नाही. हा हितोपदेश गोस्वामी तुलसीदासांनी लिहिलेल्या ‘रामचरितमानस’मधील बिभीषण गीतेत केला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि अभ्यासक प्रकाश एदलाबादकर यांनी येथे केले. अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांत आणि श्री जगदंबा देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात ‘तुलसी रामायणातील राम’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर होते.

प्रकाश एदलाबादकर पुढे म्हणाले की, बिभीषण गीतेत वर्णन केल्यानुसार ज्या वेळी रावण युद्धाला सज्ज होऊन आला, त्या वेळी बिभीषणाने प्रभु रामचंद्राला विचारले की, तुझ्याजवळ काहीही शस्त्रे नाहीत आणि रावण तर शस्त्रसज्ज आहे. अशा वेळी तुम्ही कसे लढणार ? त्याला उत्तर देतांना प्रभु श्रीरामाने सांगितले की, माझ्याजवळही धर्मरथ आहे. शौर्य आणि धैर्य ही त्याची २ चाके आहेत. सत्य आणि शील या ध्वजा आहेत. बल, विवेक, यमनियम आणि परोपकार हे ४ घोडे आहेत. क्षमा, कृपा आणि समता हे लगाम आहेत. परमेश्‍वराची भक्ती हा माझा सारथी आहे. वैराग्य हे माझे कवच आहे, तर संतोष हे माझे कृपाण आहे. दान हे माझे परशू आहेत, तर बुद्धी ही माझी शक्ती आहे. अशा स्थितीत ‘मी शस्त्रसज्ज नाही’, असे तू कसे म्हणू शकतोस बिभीषणा ? अशा स्थितीत कोणताही शत्रू माझ्यासमोर टिकणार नाही.

रामराज्य हवे असेल, तर रयतेनेही रामराज्यात जगण्यालायक व्हायला हवे !

प्रकाश एदलाबादकर पुढे म्हणाले की, राजा हा उपभोगशून्य स्वामी असतो, हा संदेशही प्रभु रामचंद्रांनी दिला आहे. रामराज्यात आचार आणि विचार यांचे स्वातंत्र्य होते, हेही ‘रामचरितमानसा’त स्पष्ट केले आहे. जर तुम्हाला रामराज्य हवे असेल, तर राज्यातील रयतेनेही रामराज्यात जगण्यालायक व्हायला हवे, हा संदेश तुलसी रामायणात दिला आहे. आपल्या व्यक्तीगत आयुष्याचा रथ, समाजरथ आणि राष्ट्राचा रथ चालवायचा असेल, तर धर्माधिष्ठित वर्तन आवश्यक आहे.

प्रत्येकाला ‘राम’ व्हायचे असेल, तर आपल्यातील ‘रावण’ बाजूला करा ! – डॉ. शरद निंबाळकर

डॉ. शरद निंबाळकर म्हणाले, ‘‘प्रत्येक व्यक्तीला राम व्हायला आवडेल; मात्र त्यासाठी प्रत्येकाने आपल्यातील रावण बाहेर फेकून देत आपल्यातील राम जागृत करावा लागेल, असा संदेश प्रभु रामचंद्रांनी आपल्या कृतीतून दिला आहे. रावण हाही ब्राह्मण कुळातील होता. तो दशमुखी, म्हणजेच १० गुणांनी युक्त असा होता; मात्र ‘अहंकार’ या दुर्गुणाने त्याला सर्व गमवावे लागले.’’