कर्णावती (गुजरात) – अयोध्येतील १६१ फूट उंच श्रीराममंदिरावर ४४ फूट उंच धर्मध्वज फडकवण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिर आणि ध्वज यांची एकूण उंची २०५ फूट असेल. हा ध्वजासाठीचा दंड कर्णावती येथून, म्हणजे १ सहस्र ३५० किलोमीटर दूरवरून आणण्यात आला आहे. हा दंड ‘अंबिका इंजिनिअर्स’ या आस्थापनाने ७ मासांमध्ये बनवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठेच्या वेळी यावर ध्वज लावतील.
श्मामल मूर्तीची प्राणप्रतिष्ठेसाठी झाली आहे निवड !
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मूर्तींपैकी श्यामल मूर्तीची प्राणप्रतिष्ठेसाठी निवड करण्यात आली आहे. मूर्तीचे वजन दीड टन, म्हणजेच १ सहस्र ५०० किलो आहे. ही मूर्ती अतिशय विशेष दगडापासून बनवली आहे. या मूर्तीला पाणी आणि दूध अर्पण केल्याने तिच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. प्रतिवर्षी श्रीरामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता सूर्याची किरणे प्रभु श्रीरामाच्या कपाळावर पडतील. प्रतिदिन श्री रामललाला शरयूच्या पाण्याने स्नान घालण्यात येईल आणि हे तीर्थ भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाईल.
१८ जानेवारीला गर्भगृहात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार !
चंपत राय यांनी सांगितले की, १६ जानेवारीपासून श्री रामललाच्या पूजेच्या विधीस प्रारंभ होणार आहे. १८ जानेवारीला गर्भगृहात श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. श्रीराममंदिर परिसरातच महर्षि वाल्मीकि आणि महर्षि वशिष्ठ यांची प्रतिष्ठापना होणार आहे. महर्षि विश्वामित्र, महर्षि अगस्त्य, निषाद राज, माता शबरी आणि देवी अहिल्या यांची मंदिरेही बांधली जातील. याखेरीज जटायूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
संपूर्ण उत्तर भारतात असे भव्य मंदिर नाही !
चंपत राय म्हणाले की, श्रीरामाचे मंदिर अप्रतिम आहे. दक्षिण भारतात अशी मंदिरे आहेत; पण उत्तर भारतात गेल्या ३०० वर्षांत असे एकही मंदिर बांधले गेले नाही.बांधकाम करणाऱ्या अभियंत्यांचेही तसेच म्हणणे आहे. भूमीच्या संपर्कात आल्यानंतरही मंदिराचे दगड ओलावा शोषू शकणार नाहीत; कारण त्याच्या खाली ‘ग्रॅनाइट’ बसवलेले आहे. मंदिराचे वय जसजसे वाढत जाईल, तसतसे भूमीखाली एक अतिशय भक्कम खडक सिद्ध होईल, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. भूमीवर कोणत्याही प्रकारचे काँक्रीट वापरलेले नाही; कारण काँक्रीटचे वय १५० वर्षांपेक्षा अधिक नसते.
रात्री १२ वाजेपर्यंत घेता येणार दर्शन !
चंपत राय यांनी सांगितले की, २२ जानेवारीला देशभरातील ५ लाख मंदिरांमध्ये भव्य पूजा होणार आहे. संध्याकाळी प्रत्येक सनातनी व्यक्तीने घराबाहेर किमान ५ दिवे लावावेत. २६ जानेवारीनंतर लोक मंदिरात येऊ शकतात. रात्रीचे १२ वाजले, तरी सर्वांनी दर्शन घेईपर्यंत मंदिराचे दरवाजे उघडे रहातील.