नवी देहली – येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराममंदिराचे उद्घाटन होणार आहे. याच दिवशी आपल्या बाळाचाही जन्म व्हावा, यासाठी अयोध्येतील अनेक गर्भवती माता शस्त्रकर्म प्रसूतीसाठी (सिझेरियन प्रसूतीसाठी) प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. या महिलांनी रुग्णालयांकडे यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे ‘यावर काय करावे ?’ असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडला आहे. यासंदर्भात ‘इंडिया टुडे’ने कानपूर सरकारी रुग्णालयातील विभागप्रमुखांचा संदर्भ देत हे वृत्त दिले आहे.
सौजन्य विऑन
१. विभागप्रमुख डॉ. सीमा द्विवेदी यांनी सांगितले की, आम्हाला प्रतिदिन १४ ते १५ दाम्पत्यांकडून ‘२२ जानेवारीलाच प्रसूती करा’ असे अर्ज येत आहेत. अशा स्थितीत सामान्य पद्धतीने प्रसूती होणे निवळ अशक्य आहे. आम्ही त्यांना यासाठी शस्त्रकर्म करावे लागेल, हे समजावून सांगितले आहे. काही दाम्पत्य तर त्यांना कुणीतरी सांगितलेल्या मुहूर्तावरच बाळाचा जन्म व्हावा, यासाठी मागे लागले आहेत. अशा वेळी मुदतपूर्व प्रसूतीमधून निर्माण होणार्या अडचणींकडेही दुर्लक्ष करण्याची त्यांची सिद्धता असते. सध्या रुग्णालयाने आतापर्यंत २२ जानेवारी या दिवशी ३५ शस्त्रकर्मांचे नियोजन केले आहे. आम्ही एरव्ही दिवसाला केवळ १४ ते १५ शस्त्रकर्म करतो.
२. या गर्भवती महिलांपैकी काहींनी म्हटले आहे की, श्री रामललाच्या आगमनाच्या दिवशीच आमच्या बाळाचा जन्म व्हावा, अशी आमची इच्छा आहे. गेल्या १०० वर्षांपासून आम्ही श्रीराममंदिराची वाट पहात आहोत. आमच्या बाळाचे या जगात आगमन होण्यासाठी हा एक दैवी योग आहे.