‘वाल्मीकि रामायण हे अधिकृत रामायण म्हणून ओळखले जाते. वाल्मीकि रामायण केवळ ऐतिहासिक काव्य नसून मानवाचा जीवन मार्ग उजळणारा तो एक महान ‘दीपस्तंभ’ आहे. या रामायणात सागराची गंभीरता, गंगेची पवित्रता आणि हिमालयाची उत्तुंगता आहे. वाल्मीकि ऋषींनी लिहिलेले रामायण ‘आदिमहाकाव्य’ म्हणून गौरवले आहे. वाल्मीकि रामायण वाचून अन्य रामायणे, म्हणजे राम नसलेली रामायणे आहेत.
रामावाचून रामायण, म्हणजे सुरावाचून संगीत, प्रेमावाचून प्रेमविवाह, शब्दावाचून साहित्य, चंद्रावाचून चांदणे आणि गळ्यावाचून गाणे होय ! ‘वाल्मीकि रामायणात खरा राम आहे. काहींनी राम समजून न घेता कपोलकल्पित कल्पनांच्या भरार्या मारून रामकथेच्या सांगाड्यात आपल्या कल्पनांचा येथेच्छ पेंढा भरून रामकथा सांगितली आहे’, असे न्यायाधीश राम केशव रानडे म्हणतात. (संदर्भ : रामायणातील व्यक्तीदर्शन, लेखक : न्यायाधीश राम केशव रानडे, पृष्ठ ३)
न्यायाधीश राम केशव रानडे म्हणतात, त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी कथन केलेले श्रीराम हे वाल्मीकि रामायणातील राम नाहीत. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या कल्पनेचा पेंढा भरून निर्माण झालेल्या रामकथेतील श्रीरामांचे वर्णन केले आहे; म्हणून या लेखाचे शीर्षक ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या आव्हाडांचे राम नसलेले रामायण’, असे दिले आहे.
१. श्रीरामाने वास्तूशांतीविषयी सांगतांना फलाहार करत असल्याविषयी सांगणे
‘वाल्मीकि रामायणा’च्या आधारे श्रीराम मांसाहार करत नव्हते, हे सिद्ध करता येते. श्रीरामचंद्रांना १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला. लक्ष्मण आणि सीता यांच्यासह त्यांनी तो वनवास भोगला. प्रभु श्रीरामांनी चित्रकूट पर्वतावर वास्तव्य करायचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी लक्ष्मणाला तिथे पर्णकुटी बांधण्यास सांगितले. पूर्ण कुटी बांधून झाल्यावर वास्तूशांती करण्याच्या हेतूने सर्व सिद्धता करण्यात आली. ‘वास्तूशांती का करायची ?’, याचे कारण सांगतांना श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले,
‘कर्तव्यं वास्तुशमनं सौमित्रे चिरजीविभि: ।’ (वाल्मीकि रामायण, काण्ड २, सर्ग ५६, श्लोक २२) म्हणजे ‘दीर्घ जीवनाची इच्छा करणार्या पुरुषाने वास्तूशांती अवश्य केली पाहिजे.’
वाल्मीकि रामायण अयोध्याकांड सर्ग ५६, श्लोक २२ आणि २३ या २ श्लोकांचा शब्दशः अर्थ घेतला, तर गोंधळ उडतो वा अर्थाचा अनर्थ होतो. आपण ते २ श्लोक आणि त्याचा नेमका अर्थ काय आहे ? ते जाणून घेऊया.
ऐणेयं मांसमाहृत्य शालां यक्ष्यामहे वयम् ।
कर्तव्यं वास्तुशमनं सौमित्रे चिरजीविभि: ।।
– वाल्मीकि रामायण, काण्ड २, सर्ग ५६, श्लोक २२
भावार्थ : सुमित्रा कुमार (लक्ष्मणा), आपण गजकंदाचा गर घेऊन त्यानेच पर्णशाळेच्या अधिष्ठात्री देवतांचे पूजन करूया; कारण दीर्घ जीवनाची इच्छा बाळगणार्या पुरुषाने वास्तूशांती अवश्य केली पाहिजे.
या श्लोकात ‘ऐणेयं मांसम’ असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. संस्कृतमध्ये या शब्दप्रयोगाचा अर्थ गजकंद नावाचा कंद असा आहे. त्यामुळे येथे मांस याचा शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही. याचे कारण असे की, श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई हे भरद्वाज ऋषींच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी श्रीरामांनी त्यांना सांगितले, ‘वडिलांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही तिघेही फलाहार करून धर्माचरण करणार आहोत.’
त्यामुळे वडिलांना दिलेले वचन तंतोतंत पाळणारे ‘श्रीराम मांसाहार करतात’, असे होणार नाही. श्रीराम एकवचनी होते. सत्यवचनी होते. त्यामुळे ‘मृग’ या शब्दाचा अर्थ ‘गजकंद’ असाच घेतला पाहिजे.
मृगं हत्वाऽऽनय क्षिप्रं लक्ष्मणेह शुभेक्षण ।
कर्तव्य: शास्त्रदृष्टो हि विधिर्धर्ममनुस्मर ।।
– वाल्मीकि रामायण, काण्ड २, सर्ग ५६, श्लोक २३
भावार्थ : कल्याणदर्शी लक्ष्मणा ! तू गजकंद नावाच्या कंदाला उपटून किंवा खणून लवकर आण; कारण शास्त्रोक्त विधीचे अनुष्ठान आपल्यासाठी आवश्यक कर्तव्य आहे. तू सदैव धर्माचे चिंतन कर.
‘मदनपाल निघण्टु’नुसार ‘मृग’ या शब्दाचा अर्थ गजकंद असा आहे. गजकंद रोग निवारण करणारे कंद आहे. याचा उपयोग वैद्यकीय शास्त्रात केला जातो. विशेषतः त्वचारोग किंवा कुष्ठरोग दूर करण्यासाठी हा गजकंद उपयुक्त आहे, (संदर्भ : वाल्मीकि रामायण, आयोध्याकांड, स्वर्ग ५६, पृष्ठ ३९५ वरील तळ टीप) तसेच संपूर्ण रामायणात ‘श्रीराम मांसाहारी होते’, असा कुठेही उल्लेख आढळत नाही.
२. ‘श्रीराम मांस भक्षण करत होते’, असे म्हणणे, म्हणजे ‘स्वतःच्या बुद्धीचे दिवाळे निघाल्यासारखेच’ !
सर्वांना ज्ञात असलेले श्रीरामाचे स्तोत्र, म्हणजे ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ होय. या श्रीरामरक्षास्तोत्रातील श्लोक १८ मध्ये ‘श्रीराम आणि लक्ष्मण कंदमुळे खात होते’, असे स्पष्टपणे सांगणारा उल्लेख आहे, तसेच ‘सर्व प्राण्यांना अभय देणारे’, असे श्रीरामाचे वर्णन श्रीरामरक्षास्तोत्रातील १९ व्या श्लोकात करण्यात आले आहे.
जे श्रीराम सर्व प्राण्यांना अभय देतात आणि केवळ फळे अन् कंदमुळे हा ज्यांचा आहार आहे, तरीसुद्धा ‘श्रीराम मांस भक्षण करत होते’, असे म्हणणे, म्हणजे ‘स्वतःच्या बुद्धीचे दिवाळे वाजले आहे’, असे मान्य करणे होय. श्रीरामासारख्या पुरुषोत्तमाचा अधिकृत असलेला ग्रंथ, म्हणजे ‘वाल्मीकि रामायण’ होय. अशा ग्रंथाचा सखोल अभ्यास करायचा नाही आणि आपल्या मनाला वाटेल, तसे वक्तव्य करायचे. आपण जे वक्तव्य करतो, ते कोणत्या ग्रंथाच्या आधारे केले आहे, हे सांगण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे नाही.
३. हिंदु संस्कृतीत मांसाहार निषिद्ध !
शरीरशास्त्राच्या दृष्टीने विचार केला, तरीही मानवप्राणी हा निसर्गतः शाकाहारी आहे. मानवाची शरीररचना ही शाकाहारी प्राण्यांच्या शरिराप्रमाणे आहे. शाकाहारी प्राणी हे मांसाहारी प्राण्यांप्रमाणे द्रव पदार्थ जिभेने चाटून प्राशन करत नाहीत. सर्व शाकाहारी प्राणी पाणी घोटाघोटाने पितात. शाकाहारी प्राण्यांचे डोळे गोलाकार नसून निमुळते आहेत. मांसाहारी प्राण्यांचे डोळे गोलाकार असतात. मांसाहारी प्राण्यांचे आणि शाकाहारी प्राण्यांचे दात सारखे दिसत नाहीत. त्यामुळे निसर्गतः माणूस शाकाहारी आहे; म्हणूनच आपल्या हिंदु संस्कृतीत मांसाहार निषिद्ध मानला आहे, ही गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही.
४. जितेंद्र आव्हाड सांगतात, ते राम नसलेले रामायण !
रामायण काळात निसर्ग नियमांचे पालन काटेकोरपणे केले जात होते. निसर्ग नियमांचे पालन काटेकोरपणे केले नाही, तर नैसर्गिक समतोल ढासळतो आणि आपत्ती निर्माण होते. रामायणकाळात कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्याचे वर्णन आढळत नाही. निसर्गाचा समतोल ढासळला नाही, याचे वर्णन महर्षि वाल्मीकि यांनी रामायणात केलेले आढळते.
वसतस्तस्य रामस्य वने वनचरैः सह ।
– वाल्मीकि रामायण, काण्ड १, सर्ग १, श्लोक ४३
भावार्थ : वनात वनचरांसमवेत रहाणारे श्रीराम.
‘वनचरांसमवेत रहाणारे श्रीराम याचा अर्थ वनातील प्राण्यांसमवेत श्रीराम सहजीवन जगत होते’, असा होतो. थोडक्यात जितेंद्र आव्हाड सांगतात, ते राम नसलेले रामायण आहे.’
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (५.१.२०२४)
संपादकीय भूमिकाप्रभु श्रीरामावर टीका करणारे निधर्मीवादी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांवर टीका करण्याचे धाडस करत नाहीत, हे जाणा ! |