कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील घटनेतील दोषींवर आजच कारवाई करू ! – उदय सामंत, मंत्री

उदय सामंत

नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्यूसंबंधातील अहवाल प्राप्त झाला आहे. घटना घडली तेव्हा साहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापक त्या ठिकाणी उपस्थित असायला हवे होते; ते त्या ठिकाणी नव्हते. अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांना आदेश आजच्या आज (२० डिसेंबर या दिवशी) देण्यात येतील, असे स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिले. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे १८ रुग्णांच्या मृत्यूसंबंधातील तारांकित प्रश्न आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला होता.

त्यावर सामंत म्हणाले, ‘‘त्या दिवशी झालेल्या १८ मृत्यूंपैकी ९ रुग्ण अचानक खासगी रुग्णालयांतून अनेक रुग्ण आयत्या वेळी भरती झाले होते. त्यांची अत्यंत गंभीर स्थिती होती. त्यांच्यावर त्वरित उपचार चालूही करण्यात आले होते. त्या वेळी औषधे, ऑक्सिजन, खाटा उपलब्ध होत्या. औषधांअभावी किंवा सेवेअभावी रुग्णांचा मृत्यू झाला नाही. हा प्रसंग घडण्यापूर्वी त्या रुग्णालयांमध्ये ४८ पदांची भरती केली होती. आणि यानंतर १४५ पदांची भरती ही तात्पुरती आणि कायमस्वरूपी अशा स्वरूपात केली आहे.’’