नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – श्री तुळजापूर येथील भवानीदेवीचा प्राचीन १ किलो सोन्याचा मुकुट गायब, दुर्मिळ दागिन्यांच्या वजनांमध्ये तफावत याविषयी तत्काळ आदेश देऊन ती तक्रार नोंद करण्यास सांगतो, असे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये १९ डिसेंबर या दिवशी सांगितले. याविषयी आमदार महादेव जानकर यांनी औचित्याचे सूत्र उपस्थित केले होते.
सौजन्य झी 24 तास
आमदार महादेव जानकर या वेळी म्हणाले, ‘‘श्री तुळजापूर भवानीदेवीचा प्राचीन १ किलोचा सोन्याचा मुकुट गायब असल्याचे दागिने समितीच्या पडताळणीमध्ये दिसून आले आहे’, असा अहवाल जिल्हाधिकार्यांनी प्रसिद्ध केला आहे. देवीच्या खजिन्यातील दुर्मिळ दागिन्यांच्या वजनामध्ये कमालीची तफावत दिसून आली आहे. देवीच्या नित्योपचारासाठी वापरण्यात येणारे हिरे, मोती, माणिक आणि पाचू असे अनेक अलंकार मंदिराच्या तिजोरीतून गायब असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी अद्यापही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला नसून या अहवालांवर कोणतीच कारवाई केल्याचे दिसून आले नाही. तरी या प्रकरणांमध्ये शासनाने तत्काळ लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी.’’
तक्रार नोंद नसल्याने अन्वेषण थांबले !विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे म्हणाल्या, ‘‘यावर जिल्हाधिकार्यांनी तक्रार नोंद करण्याची सिद्धता दाखविली आहे. वजनामध्ये तफावत आहे, भेसळ असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये तक्रार नोंद नसल्यामुळे पुढील अन्वेषण थांबले आहे.’’ |