कर्नाटक राज्यस्तरीय मंदिर परिषद
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकात अनुमाने ३५ सहस्र मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. देवस्थाने लुटणे हा सरकारीकरण करण्याचा मूळ उद्देश आहे. सरकारीकरण झालेल्या सर्व मंदिरात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होतो, असा त्याचा अर्थ होतो, अशी टीका अधिवक्ता किरण बेट्टदपूर यांनी येथे आयोजित मंदिर परिषदेमध्ये सरकारवर केली. कर्नाटक देवस्थान-मठ आणि धार्मिक संस्था महासंघ अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर १६ आणि १७ या दिवशी गंगम्म तिम्मय्या कन्व्हेशन सेंटरमध्ये ही राज्य स्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या दुसर्या दिवशी अधिवक्ता बेट्टदपूर बोलत होते. ‘मंदिरांमध्ये गैरव्यवहार किंवा भांडण झाले, तर अशा मंदिरांचे सरकारीकरण करावे; परंतु २ वर्षांत सर्व समस्या सोडवून सरकारीकरण झालेली मंदिरे पुन्हा भक्तांना सोपवावी, असा कायदा आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.
१. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी या वेळी हलाल प्रमाणापत्राविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर समितीचे श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी हिंदु जनजागृती समिती आणि अनेक धार्मिक संस्था यांनी मिळून लढा दिल्याने सरकारीकरण झालेल्या मंदिरांमधील भ्रष्टाचार उघड झाल्याची माहिती दिली.
२. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘शहरी नक्षलवाद हिंदु धर्माचा नाश करण्यासाठी कसा प्रयत्न करत आहे’, याची माहिती दिली. सनातन संस्थेचे पू. रमानंद गौडा यांनी सनातन संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याविषयी माहिती सांगून देवस्थाने धर्मशिक्षण केंद्र होण्यासाठी मार्गदर्शन केले.