संपादकीय : सुखावणारी शिक्षा !

(प्रतिकात्मक चित्र)

काही दिवसांपूर्वी गुजरातमधील वलसाड येथील न्यायालयाने आझाद रियाजुद्दीन अन्सारी (वय ३४ वर्षे) याला श्री गणेशाचा अवमान केल्यावरून ३ वर्षांच्या कारावासाची, तसेच ५० सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. त्याने वर्ष २०१८ मध्ये फेसबुकवर श्री गणेशाच्या मूर्तीला कुत्रा चाटत असल्याचे चित्र दाखवून त्याखाली ‘श्री गणेशाची पूजा करतांना कुत्रा’, असे लिहिले होते. ‘त्याला झालेली शिक्षा पुरेशी नाही’, असे कुठल्याही देवभोळ्या हिंदूला वाटेल. हे जरी सत्य असले, तरी अशा प्रकारात ५ वर्षांनी थोडीशी का होईना, शिक्षा झाली, हे महत्त्वाचे ! सध्या कुठल्याही सामाजिक माध्यमावर दृष्टी टाकल्यास हिंदूंच्या देवतांवर अश्लाघ्य ‘पोस्ट’ प्रसारित केलेल्या असतात. अशांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतात. हिंदू त्या विरोधात तक्रारीही करतात; मात्र त्यापुढे काहीही होत नाही. यास कारण आपले कायदे ! ‘सर्वांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे’, अशी ढाल पुढे करून हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ आणि संस्कृती यांवर आघात केले जातात. सध्याचे बोलके उदाहरण म्हणजे समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य करत असलेली वादग्रस्त वक्तव्ये होय ! त्यांनी रामचरितमानस जाळण्याचे आवाहन केले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘अयोध्येतील श्रीराममंदिरात होणार्‍या श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना हे नाटक आहे’, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रारी नोंदवण्यात आल्या; मात्र त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आल्या; मात्र ‘माझे कुणीही काहीही करू शकणार नाही’, हे बहुदा त्यांना ठाऊक असल्यामुळे ते निश्चिंत आहेत आणि काही ठराविक कालावधीनंतर ते हिंदु धर्मावर टीका करतच असतात. ‘देशात कायद्याचे राज्य आहे’, असे केवळ बोलण्यापुरते आहे का ? भारतीय कायद्यांचा आधार घेत हिंदुद्वेष्ट्यांना हिंदु धर्माच्या विरोधात अश्लाघ्य टीका करण्यापासून रोखता येत नाही. भारतात धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात कायदे आहेत; मात्र एखाद्याला कठोर शिक्षा मिळवून देण्याएवढे ते कठोर नाहीत. त्यामुळे हिंदुद्वेष्ट्यांचे फावते.

‘सनातन धर्म हा डेंग्यू आणि मलेरिया यांसारखा असून तो नष्ट करणे आवश्यक आहे’, असे वक्तव्य तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केले होते. या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठली. देशभर त्यांच्या विरोधात तक्रारी नोंदवण्यात आल्या; मात्र त्यापलीकडे जाऊन काहीही झाले नाही. हिंदूबहुल भारतात प्राचीन धर्म असणार्‍या आणि कोट्यवधी लोक ज्या धर्माचे पालन करतात, तो धर्म नष्ट करण्याची भाषा केली जाते आणि ती करणार्‍याच्या विरोधात काहीही कारवाई होत नाही, ही हिंदूंची शोकांतिकाच ! या पार्श्वभूमीवर अन्सारी याला न्यायालयाने सुनावलेली शिक्षा ही हिंदूंना सुखावणारी आहे. जशी अन्सारी याला शिक्षा झाली, तशी कायद्याच्या आधारे अन्य हिंदुद्वेष्ट्यांनाही ती व्हायला हवी. यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक !