आज, १४ नोव्हेंबर २०२३ या दिवशी ‘बलीप्रतिपदा’ आहे. त्या निमित्ताने…
Diwali Deepawali diwali 2023 deepawali 2023 Lakshmipujan
कार्तिक शुक्ल प्रतिपदा हा दिवस ‘बलीप्रतिपदा’ म्हणून ओळखला जातो. हा दिवस विक्रम संवत्सराचा ‘वर्षारंभ दिन’ मानला जातो. म्हणूनच या दिवसाला ‘दिवाळी पाडवा’ म्हणतात. व्यापारी लोक या दिवसापासून नवे ‘व्यापारी वर्ष’ चालू करतात. साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त या दिवशी असतो. या दिवशी स्त्रिया पतीला ओवाळतात. दिवाळीतील ५ दिवसांपैकी हाच दिवस प्रमुख समजला जातो. याच दिवशी पार्वतीने शंकराला द्युतात हरवले; म्हणून या प्रतिपदेला ‘द्युतप्रतिपदा’, असेही म्हणतात.
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला ‘गोवर्धन प्रतिपदा’, असेही म्हणतात. श्रीकृष्णाने करंगुलीवर गोवर्धन पर्वत उचलून गोकुळाचे पर्जन्यापासून संरक्षण केले, तो हा दिवस. बलीप्रतिपदेच्या दिवशी ‘गोवर्धन पूजा’ करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा, फुले खोचतात आणि श्रीकृष्ण, गोपाळ, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्या सर्वांची पूजा करतात. या दिवशी महाराष्ट्रात म्हशींची पूजा करण्याची पद्धत आहे. म्हशींना सजवून त्यांना गोडधोड खाऊ घालतात. गवळी, गुराखी या दिवशी गायी-म्हशींना गाणे म्हणून ओवाळतात.
– प्रा. रवींद्र धामापूरकर, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग.
(साभार : मासिक ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक २०११)
बटू वामनाच्या पराक्रमाच्या स्मृतीचा दिवस म्हणजे बलीप्रतिपदा !
प्रजेला सुख देणार्या बळी राजाला पाताळात घालवून देणार्या बटू वामनाच्या पराक्रमाच्या स्मृतीचा हा उत्सव. कुणी म्हणेल, ‘बळी सुख देत होता; मग त्याला अधोगती का ?’ या प्रश्नातच अज्ञान दडलेले आहे. सुखापेक्षा हिताला प्राधान्य देणारी आपली संस्कृती आहे. माझे सद़्गुरु हा भेद (फरक) स्पष्ट करतांना नेहमी एक उदाहरण द्यायचे. मूल शाळेत जाऊन शिकून शहाणे व्हावे; म्हणून आई-बाप त्यांना शाळेत घालतात; पण मुलाला शाळेत न जाणे सुखाचे वाटते, अभ्यास, शिस्तीत वागणे त्यांना त्रासदायक वाटते. शाळेत न जाण्यात मुलाला सुख वाटते; म्हणून त्याला शाळेत न पाठवणे आईला पटते का ? ती प्रसंगी दोन रट्टे मारूनही त्याला शाळेत बसायला लावते. प्रजेच्या सुखासाठी सर्व साधने माणसाची क्रियाशीलता नाहीशी झाली की, पुढची पायरी गुलामगिरीची असते. बळीने राज्यातील ज्ञानसाधना नाहीशी केली, शिक्षण देणार्या आश्रमांना कुलपे ठोकली; म्हणून त्याला अधोगती प्राप्त झाली.
त्याने शुक्राचार्य अडवत असतांनाही प्रत्यक्ष परमेश्वर भिक्षा मागत आहे; म्हणून प्रसन्नतेने दान दिले. दानाचा महिमा बळीने वाढवला; म्हणून प्रसन्न होऊन परमेश्वराने त्याला ‘वर माग’ म्हणून सांगितले. त्याने आपल्या राज्याची आठवण म्हणून ‘तुझ्या तीन पावलांची स्मृती म्हणून प्रत्येक वर्षी या ३ दिवस सर्वत्र लखलखाट असावा, कुठेही दैन्य राहू नये, उत्साह आणि प्रसन्नता याने सर्वांचे जीवन उजळून निघावे’, हा वर मागितला. अशा प्रकारे ‘प्रकाशपूजा करणार्याला यमयातना भोगायला लागू नयेत अन् लक्ष्मीनेही त्याचे घर कधीही सोडू नये, हे फल त्याला मिळावे’, असेही मागितले. बळीच्या स्मृतीसाठी आपण हे प्रकाशाचे पर्व साजरे करतो. वामनाच्या स्मृतीसाठी ज्ञानसंवर्धन करण्याची प्रतिज्ञा करायलाही आपण सिद्ध असले पाहिजे. दिवसातील निदान अर्धा घंटा तरी वैचारिक वाङ्मय, संतसाहित्य वाचायचा नेम आपण या दीपावलीला साक्षी ठेवून आचरणात आणूया.
– सौ. वसुधा ग. परांजपे, पुणे.
(साभार : मासिक ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक, वर्ष १)