पाठ्यपुस्तकांत देशाचा ‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ असा उल्लेख करावा !

‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ची (‘एन्.सी.ई.आर्.टी.’ची) शिफारस !

नवी देहली –  शालेय पाठ्यपुस्तकांत देशाचा ‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ असा उल्लेख करावा, अशी शिफारस ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या उच्चस्तरीय समितीने केली.

सौजन्य टाइम्स ऑफ इंडिया 

समितीचे अध्यक्ष सी.आय. आयझॅक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, ‘‘भारत हे प्राचीन नाव आहे. ७ सहस्र वर्षे जुन्या विष्णु पुराणात ‘भारत’ हा उल्लेख आहे.  ‘इंडिया’ हा शब्द सामान्यत: ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या स्थापनेनंतर आणि वर्ष १७५७ मध्ये झालेल्या प्लासीच्या युद्धानंतर वापरला जाऊ लागला. त्यामुळे सर्व इयत्तांच्या पुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ हे नाव वापरावे, अशी सूचना समितीने एकमताने केली आहे.’’

भारतात झालेल्या ‘जी २०’ परिषदेच्या निमंत्रणपत्रिकेत देशाच्या राष्ट्रपतींनी देशाचा ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असा उल्लेख केला होता. त्या पाठोपाठ याच परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावासमोरही ‘भारत’ असे लिहिले होते, जे आतापर्यंत ‘इंडिया’ असे लिहिले जात होते. ‘जी २०’ परिषदेनंतर बोलावण्यात आलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात ‘भारत’ नावावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती.