पिंपरी (पुणे) येथे ३ मासांत डेंग्‍यूचे १४० बाधित रुग्‍ण !

महापालिका प्रशासनाकडून आवश्‍यक उपाययोजना चालू !

पिंपरी (जिल्‍हा पुणे) – शहरामध्‍ये गेल्‍या ३ मासांत डेंग्‍यूचे एकूण १४० बाधित रुग्‍ण, तर हिवतापाचे ७ बाधित रुग्‍ण आढळले आहेत. त्‍यामुळे महापालिका प्रशासनाकडून आवश्‍यक उपाययोजना करण्‍यात येत आहेत. शहरामध्‍ये जुलै मासात डेंग्‍यूचे ३६, ऑगस्‍ट आणि सप्‍टेंबर मासांत प्रत्‍येकी ५२ बाधित रुग्‍ण आढळून आले. हिवतापाचे ऑगस्‍टमध्‍ये ६ आणि सप्‍टेंबर मासात १ रुग्‍ण आढळून आला आहे. महापालिकेच्‍या वतीने आरोग्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कीटकजन्‍य आजार नियंत्रणासाठी ‘मॉस्‍क्‍युटो अबेटमेंट समिती’ची स्‍थापना केलेली आहे. महापालिकेची ८ रुग्‍णालये आणि ३४ चिकित्‍सालये यांकडून प्रत्‍येक आठवड्याला शहरातील विविध ठिकाणी लहान बालकांचे लसीकरण सत्र घेण्‍यात येत आहे.

आरोग्‍य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले की, महापालिका रुग्‍णालय आणि चिकित्‍सालये यांमध्‍ये डेंग्‍यूच्‍या पडताळणीसाठी आवश्‍यक ‘रॅपीड कीट’ उपलब्‍ध करून दिलेले आहेत. डेंग्‍यू आणि चिकनगुनिया आजाराच्‍या निश्‍चित निदानासाठी ‘सेंटीनल सेंटर’चाच ‘पॉझिटिव्‍ह’ अहवाल आवश्‍यक आहे. कोणताही ‘रॅपीड कीट’ अहवाल निश्‍चित निदानासाठी ग्राह्य धरण्‍यात येत नाही.