कारागृहात जाऊन बंदीवानांशी वार्तालाप करण्याच्या चर्चच्या मोहिमेला अनुमती देऊ नये ! – हिंदु रक्षा महाआघाडी

बंदीवानांच्या (कैद्यांच्या) मुलांचे शिक्षण आणि बंदीवानांना कायदेशीर सल्ल्याकरता अधिवक्त्याच्या शुल्काची सोय करण्यासाठी चर्च खास ‘भिक्षा-वर्गणी’ गोळा करणार !

पणजी – धर्मप्रसारासाठी आता सरकारच्या अनुमतीने काही चर्चनी यंदाच्या गांधी जयंतीचे औचित्य साधून कारागृहातील पुरुष आणि महिला बंदीवानांशी चक्क कारागृहात जाऊन स्वतंत्र वार्तालाप करण्याचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याकरता कारागृहातील बंदीवानांच्या (कैद्यांच्या) मुलांचे शिक्षण आणि बंदीवानांना कायदेशीर सल्ल्याकरता अधिवक्त्याच्या शुल्काची सोय करण्यासाठी खास ‘भिक्षा-वर्गणी’ या नावाने जनतेकडून पैसे गोळा करण्याची मोहीम चर्चने चालू केली आहे.

(चित्रावर क्लिक करा)

या मोहिमेच्या अंतर्गत कारागृहातील ३० ते ५० पुरुष बंदीवान आणि ३० महिला बंदीवान अशा गटांनी वार्तालाप आयोजित करण्यात आलेले असून प्रत्यक्ष कारागृह महानिरीक्षकांची अनुमती या उपक्रमांना मिळाल्याचे संदेश सर्वत्र गेलेले आहेत. त्याखेरीज ‘२ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ९ ते ११.३० या कालावधीत या कार्यक्रमासाठी कारागृह महानिरीक्षक उपस्थित रहाणार आहेत’, असे हाती आलेल्या संदेशावरून समजले.

‘सरकार खर्च करत असलेल्या निधीव्यतिरिक्त बंदीवानांसाठीची ही मोहीम कमकुवत मनःस्थितीतील बंदीवान आणि त्यांचे कुटुंबीय यांना हेरून त्यांचा बुद्धीभेद करून धर्मांतर घडवण्यासाठीच चर्चने योजली आहे’, असे हिंदु रक्षा महाआघाडीचे म्हणणे आहे. ‘कारागृहात घुसून अशा प्रकारे बंदीवानांना सहभागी करून घेण्याच्या मोहिमेला दिलेली अनुमती सरकारने त्वरित मागे घ्यावी आणि अशा कार्यक्रमांचे समर्थन करण्यासाठी उपस्थित रहाण्यावर कारागृह महानिरीक्षकांना बंदी घालावी’, अशी मागणी हिंदु रक्षा महाआघाडीने केली आहे.

संपादकीय भूमिका

जनतेकडून पैसा घेऊन तो बंदीवानांना कायदेशीर सल्ल्याकरता देण्यात येणार असेल, तर केलेल्या गुन्ह्याचा बंदीवानाला कधी पश्‍चात्ताप होईल का ? त्याला दिल्या गेलेल्या शिक्षेला काही अर्थ राहील का ? न्याययंत्रणेने खरे तर चर्चच्या या उपक्रमाची नोंद घेऊन नको तिथे मानवता दाखवल्याविषयी खडसावायला हवे !