Ganesh Visarjan : पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव आणि श्रद्धाभंजनाचे षड्‍यंत्र !

उद्या १९ सप्‍टेंबर २०२३ या दिवशीपासून ‘गणेशोत्‍सव’ चालू होत आहे. त्‍या निमित्ताने…

‘पर्यावरणपूरक निवडणूक’, ‘पर्यावरणपूरक ईद’, ‘पर्यावरणपूरक नद्या’ अशा प्रकारचे विषय आपण कधीही ऐकलेले नाहीत. महाराष्‍ट्रातील नद्यांच्‍या प्रदूषणाची समस्‍या मोठी आहे. निवडणुकीमध्‍ये ध्‍वनीक्षेपकांचा उपयोग वर्षभर होतो, तर ईदच्‍या दिवशी प्राण्‍यांना कापून रक्‍त नद्या, नाले किंवा इतरत्र टाकले जाते. प्राण्‍यांच्‍या शरीराचे अवशेषही अनेकदा उघड्यावर फेकले जातात. याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोणते पर्यावरणप्रेमी, पुरोगामी ना सरकार प्रबोधन करते; मात्र मागील काही वर्षांपासून ‘पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव’, ‘पर्यावरणपूरक दिवाळी’, ‘पर्यावरणपूरक होळी’, ‘पर्यावरणपूरक रंगपंचमी’ या वर्षातून येणार्‍या सणांच्‍या वेळी प्रदूषणाची टिमकी हे सर्व लोक वाजवतात. जणू काही वर्षभराचे प्रदूषण हिंदूंच्‍या सणांद्वारेच होते. ‘पर्यावरणपूरक’ याचा दुसरा अर्थ या सण-उत्‍सवांतून प्रदूषण होत असल्‍याची भावना या प्रशासकीय यंत्रणा आणि पुरोगामी कंपू यांनी समाजात दृढ केली आहे. त्‍यामुळे सद्यःस्‍थितीत हिंदु असलेले राजकीय नेते, संस्‍था याही ‘पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव साजरा करणे हीच खरी गणेशभक्‍ती आहे’, अशीही विधाने करायला लागले आहेत. वर्षभर विविध माध्‍यमांतून होणारे प्रदूषण रोखण्‍यासाठी ठोस कारवाई न करणारी ही मंडळी हिंदूंचे सण-उत्‍सव आले की, प्रदूषणाची आरडाओरड का करत आहेत ? या मंडळींना खरोखरच पर्यावरणाची काळजी आहे का ? याचे खरे स्‍वरूप या लेखाद्वारे समजून घेऊया ! (Ganesh Visarjan, Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganpati)

१. ‘अजेंडा’ (षड्‍यंत्र) अंनिसचा आणि तो राबवणारी यंत्रणा शासकीय !

महाराष्‍ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्‍यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती म्‍हणून कागदी लगद्याच्‍या मूर्ती सिद्ध करण्‍याची कल्‍पना काँग्रेस सरकारच्‍या काळात मांडली. कारखान्‍यांचे केमिकलयुक्‍त पाणी आणि सांडपाणी यांमुळे महाराष्‍ट्रातील नद्या सर्वाधिक प्रदूषित होत आहेत. हा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आहे; परंतु दाभोलकर यांनी उभ्‍या आयुष्‍यात त्‍या विरोधात आवाज उठवला नाही; मात्र त्‍यांनी ‘पर्यावरणपूरक’ म्‍हणून कागदी लगद्याची कल्‍पना काँग्रेसच्‍या गळी उतरवली. बरे कागदी लगद्याची मूर्ती पर्यावरणपूरक असते तर ठीक होते; परंतु अस्‍तित्‍वात असलेल्‍या शाडू, चिकणमाती किंवा प्‍लास्‍टर ऑफ पॅरिस यांपेक्षा कागदी लगद्याच्‍या मूर्ती सहस्रोपट प्रदूषणकारी आहेत. अशा प्रकारे पारंपरिक चालत आलेल्‍या पर्यावरणपूरक गणेशोत्‍सवाला अंनिस आणि या सरकारी यंत्रणा यांनीच छेद दिला अन् समाजात प्रदूषणकारी कागदी लगद्याच्‍या मूर्तींना प्रोत्‍साहन दिले. याच्‍या आधारावर मूर्तीदान, कृत्रित हौदात मूर्ती विसर्जित करणे आदी अशास्‍त्रीय संकल्‍पना या मंडळींनी समाजात दृढ केल्‍या. मुळातच पर्यावरणपूरक असलेल्‍या गणेशोत्‍सवामध्‍ये हस्‍तक्षेप करून या मंडळींनी उत्‍सवांद्वारे प्रदूषण होत असल्‍याचे प्रथम बिंबवले. उत्‍सव हे श्रद्धा-भक्‍ती वाढवून आध्‍यात्मिक लाभ प्राप्‍त करून घेण्‍यासाठी असतात, ही संकल्‍पना कमकुवत करून हिंदूंना ‘पर्यावरणपूरक’ गणेशोत्‍सवाच्‍या नावाने या मंडळींनी भरकटवण्‍याचे काम केले आणि ज्‍यांमुळे खरोखरच प्रदूषण होते त्‍याविषयी मात्र मौन बाळगले. अंनिसने काँग्रेसच्‍या साहाय्‍याने साध्‍य केलेल्‍या या षड्‍यंत्राला हिंदुत्‍वनिष्‍ठ समजले जाणारे पक्षही याला फसले. अंनिसचा हिंदूंच्‍या श्रद्धाभंजनाचा हा ‘अजेंडा’ अद्यापही चालू अहे.

२. अंनिस आणि काँग्रेस यांचा दांभिकपणा !

डॉ. दाभोलकर यांच्‍या नादी लागून वर्ष २०११ मध्‍ये काँग्रेस सरकारने पर्यावरणपूरक उत्‍सव साजरे करण्‍याचे आवाहन करणारी अधिसूचना काढली. कोणताही अभ्‍यास किंवा संशोधन न मागवता काँग्रेसने ही अधिसूचना काढली; मात्र या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे तत्‍कालीन समन्‍वयक पू. शिवाजी वटकर यांनी राष्‍ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली आणि त्‍या वेळी यांची पोलखोल झाली. राष्‍ट्रीय हरित लवादाने याविषयीचा शास्‍त्रोक्‍त अहवाल मागितला. मुंबईतील प्रसिद्ध ‘शासकीय रसायन तंत्रज्ञान संस्‍थे’ने केलेल्‍या संशोधनानुसार १० किलो कागदी मूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होत असल्‍याचे आढळले. त्‍या पाण्‍यात झिंक, क्रोमियम, कॅडमियम, टायटॅनिअम ऑक्‍साईट असे विषारी धातू आढळले. ज्‍येष्‍ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्‍बाराव यांच्‍या ‘एन्‍वायर्मेंटल  प्रोटेक्‍शन रिसर्च फाऊंडेशन’ या संस्‍थेच्‍या संशोधनानुसार ‘डिस्‍टील्‍ड वॉटर’मध्‍ये कागद विरघळवून प्रयोग केल्‍यावर पाण्‍यातील ऑक्सिजनची मात्रा शून्‍यावर आली. यातून कागदी लगद्याच्‍या मूर्ती जलाशयांसाठी किती हानीकारक आहेत, हे दिसून येते. अशा प्रदूषणकारी मूर्तींना अंनिस आणि काँग्रेस यांनी हिंदूंच्‍या गळी उतरवण्‍याचा प्रयत्न केला आणि वर ‘पर्यावरणपूरक गणेशोत्‍सवाचे स्‍तोम’ वाढवले. विशेष म्‍हणजे या मूर्ती प्रदूषणकारी असल्‍याचे अहवालातून स्‍पष्‍ट झाल्‍यानंतरही खरे तर पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा सरकार यांनी या मूर्तींवर बंदी घालणे आवश्‍यक होते; मात्र तसे न करता उलट ‘पर्यावरणपूरक’ म्‍हणून कागदी लगद्याच्‍या मूर्तींनाच प्रोत्‍साहन दिले. यातून या मंडळींचा दांभिकपणा लक्षात येतो.

३…. मग ‘पर्यावरणपूरक ईद’, ‘पर्यावरणपूरक निवडणूक’ का नाही ?

श्री. प्रीतम नाचणकर

हिंदूंच्‍या सण-उत्‍सवांच्‍या वेळी पर्यावरणपूरकतेचे आवाहन करणारी मंडळी ईदच्‍या दिवशी प्राण्‍यांना कापून त्‍याचे रक्‍त नाले, नद्या यांमध्‍ये सोडले जाते. या दिवशी प्राण्‍यांची हाडे मोठ्या प्रमाणात उघड्यावर फेकली जातात. त्‍याविषयी कारवाई करत नाही. दिवाळी, गणेशोत्‍सव हे तर वर्षातून एकदा येतात. या वेळी ध्‍वनीचे प्रदूषण होते म्‍हणून प्रदूषण नियंत्रण मंडळ ढोल बडवते; मग लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत राज्‍यात ठिकठिकाणी वर्षभर निवडणुका होत असतात. त्‍या वेळी मिरवणुकांमध्‍ये वाजणारे कर्णकर्णश ध्‍वनीक्षेपक, फटाक्‍यांची आतषबाजी, प्रचारसभांचा गोंगाट हे रोखण्‍यासाठी ‘पर्यावरणपूरक निवडणूक’ ही संकल्‍पना मात्र हे राबवत नाहीत. अशा प्रकारे प्रदूषण नियंत्रणाची संकल्‍पना सोयीनुसार राबवली जात आहे.

४. मग ३६५ दिवस वाजणार्‍या भोंग्‍यांचे काय ?

गणेशोत्‍सव आणि दिवाळी आली की, प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्‍यात ठिकठिकाणी ध्‍वनीचे मोजमाप करते अन् त्‍याची आकडेवारी प्रतीवर्षीच्‍या अहवालामध्‍ये प्रसिद्ध करते. हे सर्व अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहेत. या अहवालांमध्‍ये दिवाळी आणि गणेशोत्‍सव या वेळी राज्‍यातील कोणकोणत्‍या भागांमध्‍ये ध्‍वनीचे मापन केले आणि तेथे किती ‘डेसिबल’ आवाज होता ? हे प्रत्‍येक अहवालात तक्‍ता करून प्रसिद्ध करण्‍यात आले आहे; परंतु इतक्‍या वर्षांत मशिदींवरील भोग्‍यांमुळे किती प्रदूषण होते ? याची आकडेवारी एकाही अहवालात नाही. सद्यःस्‍थितीत मुंबई उच्‍च न्‍यायालय, तसेच सत्र न्‍यायालये यांमध्‍ये मशिदींवरील भोंग्‍यांच्‍या विरोधात अनेक याचिका प्रविष्‍ट आहेत. अनेक पोलीस ठाण्‍यांत तक्रारी प्रविष्‍ट आहेत. मुंबईतील चेंबूर येथे करिष्‍मा भोसले या हिंदु युवतीने मशिदीवरील भोंग्‍याचा आवाज सहन होत नाही, याविषयी पोलीस ठाण्‍यात वारंवार तक्रार करूनही कारवाई न केल्‍यामुळे तिने नमाजपठण करण्‍यासाठी आलेल्‍यांना खडे बोल सुनावले. या वेळी ध्‍वनीप्रदूषण करणार्‍यांवर कारवाई करायचे सोडून पोलिसांनी या युवतीवरच दबाव आणण्‍याचा प्रयत्न केला. त्‍या वेळी या प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोलिसांना एखादी तरी नोटीस पाठवली का ? वर्षांतून एकदा येणारे गणेशोत्‍सव, दिवाळी यांच्‍या वेळी प्रदूषणाचे मोजमाप करणारे हे मंडळ ३६५ दिवस वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्‍यांच्‍या विरोधात मात्र कारवाई करण्‍याचे धारिष्‍ट्य दाखवत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या या पक्षपाती कारभाराविषयी हिंदूंनी जाब विचारायला हवा.

५. सर्व खटाटोप स्‍वत:चा (शासकीय यंत्रणांचा) नाकर्तेपणा झाकण्‍यासाठी !

राज्‍यातील अनेक नद्यांमध्‍ये कारखान्‍यांचे रसायनयुक्‍त पाणी सोडले जाते. अनेक नद्यांमध्‍ये सांडपाणी, कचरा टाकला जातो. मुंबईतील मिठी नदीचे रूपांतर अक्षरश: गटारीमध्‍ये झाले आहे. भिवंडी येथील कामावरी नदी तर आजूबाजूच्‍या कारखान्‍यांनी सोडलेल्‍या रसायनयुक्‍त पाण्‍याने पूर्ण दूषित झाली आहे. राज्‍यात अशा कितीतरी नद्या आहेत की, रसायने, सांडपाणी, कचरा यांमुळे त्‍यांची उपयोगिता आणि अस्‍तित्‍व नष्‍ट होण्‍याच्‍या मार्गावर आहे अन् हे प्रदूषण वर्षभर चालू असते. प्रदूषण करणार्‍या कारखान्‍यांच्‍या मालकांशी साटेलोटे करायचे आणि हिंदूंच्‍या सणांना मात्र लक्ष्य करायचे, असे उद्योग प्रदूषण नियंत्रण मंडळ अन् पर्यावरण विभाग यांच्‍याकडून चालू आहेत. स्‍वत:च्‍या अशा नाकर्तेपणावर पांघरूण घालण्‍यासाठी पर्यावरणपूरक सण-उत्‍सवांच्‍या नको त्‍या उठाठेवी या शासकीय यंत्रणांनी चालू केल्‍या आहेत.

६. शासकीय पैशांचा अपव्‍यय !

मूळात पर्यावरणपूरक उत्‍सव साजरे करायचे असतील, तर प्रदूषणकारी फटाक्‍यांवर बंदी घालणे, पारंपरिक चिकणमातीच्‍या मूर्ती घेण्‍याचे आवाहन करणे, अवाढव्‍य मूर्तींऐवजी छोट्या मूर्ती आणण्‍याविषयी प्रबोधन करणे, नैसर्गिक रंग उपलब्‍ध करून देणे अशा उपाययोजनांचा अंगीकार केल्‍यास कोट्यवधी रुपये व्‍यय करून कृत्रिम तलावांची निर्मिती करण्‍याची आवश्‍यकता भासणार नाही. कृत्रिम तलावांसाठी लाखो रुपयांचे प्रावधान (तरतूद) करून हा पैसा लाटता येतो, हे यामागचे इंगित आहे.

सण-उत्‍सव हे पर्यावरणपूरक असल्‍याला कुणाचाही विरोध असण्‍याचे कारण नाही; परंतु या मंडळींचा हेतू शुद्ध नाही. एकीकडे पर्यावरणपूरक उत्‍सव म्‍हणायचे आणि दुसरीकडे प्रदूषणकारी कागदी लगद्याच्‍या मूर्तींना प्रोत्‍साहन द्यायचे अन्, खर्‍या अर्थाने वर्षभर प्रदूषण करणार्‍यांविषयी बोटचेपे धोरण स्‍वीकारून केवळ हिंदूंच्‍या सणांना लक्ष्य करण्‍याचे उद्योग या सरकारी यंत्रणांनी थांबवावेत. त्‍यांनी स्‍वत: प्रामाणिकपणे प्रदूषण रोखण्‍यासाठी काम करावे आणि भाविकांना गणेशोत्‍सव भावभक्‍तीने साजरा करण्‍याचे आवाहन करावे. यातून प्रदूषणही रोखले जाईल आणि सण-उत्‍सवांचा आध्‍यात्मिक लाभही मिळेल.

– श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई (१५.९.२०२३)