(‘सायेशा’ या नावाचा अर्थ ‘ईश्वराची छाया’, असा आहे.)
श्रावण कृष्ण नवमी (८.९.२०२३) या दिवशी चि. सायेशा गुरुप्रसाद सातपुते हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्या निमित्त तिची आजी सौ. पूजा दिलीप सातपुते (वडिलांची आई) यांना तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
चि. सायेशा गुरुप्रसाद सातपुते हिला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
१ अ. पहिला मास
१. ‘माझी सून सौ. शिवानी हिला गर्भधारणा झाली आहे’, हे कळल्यावर घरातील वातावरण पालटले. सुनेच्याही आनंदात वाढ झाली.
२. ‘सुनेची स्वीकारण्याची आणि ऐकण्याची वृत्ती वाढली’, असे मला जाणवले.
३. गर्भधारणा झाल्यापासून शिवानी नियमितपणे नामजप करत असेे आणि श्रीरामरक्षा, श्री मारुतिस्तोत्र अन् अथर्वशीर्ष नियमित म्हणत असे. ती तुळशीला पाणी घालत असे आणि सूर्याला ‘हे सूर्यदेवा, मला तुझ्यासारखे तेजस्वी बालक होऊ दे’, अशी प्रार्थना करत असे.
४. ती अत्तर आणि कापूर यांचे उपाय नियमितपणे करत असे, तसेच ती दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक पोटावर ठेवून गर्भाशी मनापासून आणि भावपूर्ण बोलत असे.
५. ती साधिका सौ. नंदिनी कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे बाळाच्या हालचालींचे निरीक्षण करून प्रार्थना करत असे, तसेच साधिका सौ. काव्या दुसे यांनी बाळ आणि आई या दोघांसाठी सांगितलेले भावजागृतीचे प्रयोगही करत असे.
१ आ. दुसरा मास : ती महाशिवरात्रीच्या दिवशी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या कक्षावर सेवेसाठी आली होती. त्या वेळी कक्षावर सेवा करतांना तिला आनंद मिळाला.
१ इ. पाचवा मास : तिला वैयक्तिक कामानिमित्त गोव्याला जावे लागले. तेथे गेल्यानंतर तिला रामनाथी येथील सनातनचा आश्रम बघण्याची इच्छा झाली. गुरुकृपेने तिला रामनाथी आश्रम पहाता आला आणि तेथील प्रसादही मिळाला.
१ ई. सहावा मास : गुरुकृपेने तिला कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’मध्ये सहभागी होता आले. तिथे तिला सद़्गुरु स्वाती खाडये, पू. सदाशिव ((भाऊ) परब (सनातनचे २६ वे (समष्टी) संत, वय ८२ वर्षे) आणि सर्व साधक यांचा सहवास मिळाला, तसेच दिंडीचे चैतन्यही मिळाले.
१ उ. सातवा मास
१ उ १. डोहाळेजेवणाच्या वेळी आलेल्या अनुभूती : शिवानीच्या डोहाळेजेवणाच्या वेळी आम्ही सभागृहात दत्ताचा नामजप लावून ठेवला आणि उदबत्ती लावून श्रीकृष्णाचे पूजन केले, तसेच शिवानीजवळ प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावून ठेवली होती. त्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
अ. ‘कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर श्रीकृष्णाच्या चित्राला घातलेल्या हाराची लांबी आपोआपच वाढली’, असे सर्वांच्याच लक्षात आले.
आ. शिवानीच्या ओटीतील तांदुळ पिवळसर रंगाचे झाले होते.
इ. ‘तिच्या केसांच्या भांगाच्या मध्यभागातून आणि बिंदीतून प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला जाणवले.
ई. ‘हा कार्यक्रम रामनाथी आश्रमात चालू आहे’, असे वाटून माझा भाव जागृत होत होता.
२. जन्मानंतर
२ अ. जन्म ते ३ मास
१. सायेशाच्या जन्माच्या दिवशी त्या रुग्णालयाच्या दारामध्ये कमलपुष्प उमलले होते. ते पाहून ‘गुरुदेवांनी जणू प्रसादरूपात आमच्या घरी लक्ष्मीच पाठवली’, असे मला वाटले.
२. बाळाला घरी आणल्यानंतर घरातील वातावरण पुष्कळ उत्साही झाले.
३. तिचा जन्म झाल्यापासून माझ्या दोन्ही मुलांच्या व्यवसायात पुष्कळ वाढ झाली.
४. सायेशा आजोळी असतांना शिवानी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ सायेशाच्या डोक्याजवळ ठेवत असे. पहाटे उठल्यावर ‘सायेशा त्या ग्रंथाकडे पाहून गुरुदेवांशी संवाद साधत आहे’, असे आम्हाला वाटत होते.
२ आ. वय ४ ते ६ मास
१. सायेशा ५ मासांची असतांना तिच्या आईच्या समवेत आजोळहून घरी आली. एखादी सात्त्विक वस्तू जशी हलकी जाणवते, तशी सायेशा एकदम हलकी जाणवत होती.
२. सायेशाला घरी आणल्यापासून घराच्या आगाशीमध्ये पक्ष्यांचा वावर वाढला.
३. ज्या दिवशी सायेशाला घरी आणले, त्या दिवशी दिवसभर श्रीकृष्णाच्या छायाचित्राजवळ एक फुलपाखरू बसले होते. ‘ते जणूकाही सायेशा येण्याची वाट बघत होते’, असे मला जाणवलेे.
२ इ. वय ७ ते ९ मास
१. सायेशाला घेऊन आम्ही गुरुपादुकांचे दर्शन घेण्यासाठी आणि साधकांना भेटण्यासाठी कोल्हापूर सेवाकेंद्रात गेलो. तिथे आम्हाला पू. सदाशिव (भाऊ) परब यांचे दर्शन झाले. त्यांना बघितल्यावर सायेशाने जुनी ओळख असल्याप्रमाणे त्यांच्याकडे झेप घेतली. ती त्यांच्याकडून आमच्याकडे येत नव्हती. तिने त्यांना घट्ट धरून ठेवले होते.
२. सायेशाचे बोरनहाण होते. त्या दिवशीच देवाच्या कृपेने आम्हाला सद़्गुरु स्वाती खाडये यांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा सायेशाने सद़्गुरु स्वातीताईंचे बोट धरून ठेवले होते.
३. लिखाण करतांना झालेले त्रास आणि आलेले अडथळे
अ. वरील लिखाण करतांना मला झोप येत होती.
आ. स्नानगृहामध्ये पालीचे पिल्लू मरून पडले होते.
इ. माझ्या वडिलांची प्रकृती बरी नहती. मला २ दिवस त्यांच्या समवेत रुग्णालयात जावे लागले.
ई. माझ्या मनात ‘हे लिखाण करू नये’, असे नकारात्मक विचार येत होते.
उ. सायेशाचे छायाचित्र काढतांना ती फार रडत होती.’
– सौ. पूजा दिलीप सातपुते (चि. सायेशाची आजी (वडिलांची आई)), कोल्हापूर (२८.७.२०२३)
|