(म्हणे) ‘डेंग्यू, मलेरिया, कोरोना यांच्याप्रमाणेच सनातन धर्मालाही संपवायचे आहे !’- तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी

तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांचे ‘सनातन निर्मूलन परिषदे’त हिंदुद्वेषी विधान !

तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी

चेन्नई (तमिळनाडू) –  तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र, तसेच राज्याचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी २ सप्टेंबर या दिवशी ‘सनातन निर्मूलन परिषदे’त सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि कोरोना या आजारांशी केली. ते म्हणाले, ‘‘सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोना यांचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे, तसेच सनातन धर्मालाही संपवायचे आहे.’’

या कार्यक्रमात उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह द्रमुकचे (द्रविड मुन्नेत्र कळघम्चे – द्रविड प्रगती संघाचे) इतर अनेक नेतेही सहभागी झाले होते. राज्याचे मनुष्यबळ विकासमंत्री पी.के. शेखरबाबू हेही सहभागी झाले होते.

(म्हणे) ‘भगव्या धमक्यांना घाबरत नाही !’

‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सामाजिक माध्यमावर ‘लीगल राईट्स ऑब्झर्व्हेटरी’  नावाच्या खात्यावरून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये ते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहेत. या ट्वीटवर उदयनिधी यांनी ट्वीट करून प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘‘मी कोणत्याही कायदेशीर आव्हानासाठी सिद्ध आहे. अशा भगव्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. आम्ही पेरियार (तमिळनाडूतील नास्तिकतावादी विचारवंत) आणि अण्णा (अण्णादुराई – माजी द्रविड नेते) यांंचे अनुयायी आहोत. मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय राखण्यासाठी संघर्ष करत रहाणार. मी आज, उद्या आणि सदैव सांगेन की, द्रविड भूमीतून सनातन धर्माला रोखण्याचा आपला संकल्प अजिबात अल्प होणार नाही.’’

‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत हे ठरले होते का ? – भाजपचा प्रश्‍न

भाजपचे नेते अमित मालवीय यांनी ट्वीट करत ‘सनातन धर्म मानणार्‍या देशातील ८० टक्के लोकसंख्येला संपवण्याची ते भाषा करत आहेत. द्रमुक हा विरोधी पक्षातील प्रमुख तर काँग्रेसचा सहकारी पक्ष आहे. स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर मुंबईतील बैठकीत एकमत झाले होते होते का ?’, असा प्रश्‍नही मालवीय यांनी विचारला आहे.

भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई म्हणाले की, उदयनिधी स्टॅलिन, तुमचे वडील किंवा तुमचे विचार हे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून उधार घेतलेले आहेत.

राजकारणात धर्म आणण्याला भाजपचे नेतेच उत्तरदायी आहेत ! – काँग्रेस

काँग्रेस नेते राशिद अल्वी म्हणाले की, आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे. देशात सर्व धर्मांचे लोक रहातात; मात्र गेल्या ९ वर्षांपासून भाजप धर्माचे राजकारण करत आहे. त्यामुळेच आता कुणीही उठतो आणि धर्माविषयी बरळतो. आता ज्यांनी विधान केले आहे ते चुकीचे आहे; मात्र राजकारणात धर्म आणण्याला भाजपचे नेतेच उत्तरदायी आहेत, अशी टीका केली.  (याला म्हणतात, ‘चोर सोडून संन्याशाला फासावर चढवणे !’ – संपादक)

सौजन्य: TV9 Bharatvarsh

उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, आमचे धोरण स्पष्ट आहे की, आम्ही कोणत्याही धर्मावर टीपणी करू इच्छित नाही आणि कुणाच्या भावना दुखावू इच्छित नाही.

सनातन धर्म युगांपासून अस्तित्वात ! – आचार्य सत्येंद्र दास

श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटले की, सनातन धर्माला कोणत्याही किमतीत नष्ट करता येणार नाही. सनातन धर्म युगांपासून अस्तित्वात आहे आणि राहील. उदयनिधी यांना सनातन धर्माचा अर्थच ठाऊक नाही. ते जे काही बोलत आहेत, ते चुकीचे आहे.

सनातन निर्मूलन परिषदेच्या विरोधात तक्रार

भारत हिंदू मुन्नानीचे राज्य समन्वयक डी. रामकृष्णन् यांनी या परिषदेच्या विरोधात आणि त्याचे आयोजक वीरामानी, सेंथिलनाथन, जगदीश्‍वरन् बूपलन आणि रोहिणी यांच्या विरोधात चेन्नई पोलीस आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार केली आहे. ही तक्रार पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आली आहे. हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता मुथारसू यांनी ही तक्रार करण्यास साहाय्य केले.

संपादकीय भूमिका

  • मोगलांना जे जमले नाही, ते करण्याचे हास्यास्पद विधान उदयनिधी स्टॅलिन करत आहेत. उदयनिधी यांनी राज्यातील डेंग्यू, मलेरिया आणि कोरोना यांना प्रथम संपवून दाखवावे आणि मग सनातन धर्माविषयी तोंड उघडावे !
  • जगात जिहादी आतंकवादाने कहर केला असतांना तो नष्ट करू, जिहाद्यांना नष्ट करू, जिहादी ज्या धर्मांचे आहेत, तो नष्ट करू, असे विधान करण्याचे धाडस उदयनिधी करत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • ‘श्रीलंकेतील तमिळींचा वंशसंहार करणार्‍या श्रीलंकेला संपवू’, असे कधी विधान द्रविड नेते करत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • तमिळनाडूमध्ये सनातन निर्मूलन परिषद घेतली जाते आणि त्याला राज्याचे मंत्री उपस्थित रहातात, हीच त्यांची धर्मनिरपेक्षता आहे का ? राज्यघटनेचे खरे रक्षक असल्याचे म्हणणार्‍या राजकीय पक्षांना हे मान्य आहे का ?