संभाजीनगर – गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आजघडीला शहराला ५ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून कागदोपत्री देण्यात आली आहे; पण प्रत्यक्षात शहरात अनेक ठिकाणी ८ दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे शहरात पुन्हा पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. (प्रत्यक्षात ८ दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नसतांना ५ दिवसांचा अहवाल का दिला ? याच्या मुळाशीही जायला हवे ! – संपादक)
पाणी प्रश्नावरून संभाजीनगर खंडपिठात अनेकदा चर्चा झाली. पाणीपुरवठ्याच्या नियोजनावरून अनेकदा न्यायालयाने महानगरपालिका प्रशासनाला खडेबोल सुनावले. काही दिवसांपूर्वी महापालिकेने न्यायालयात शपथपत्र सादर करून ५ दिवसांआड पाणी देण्याची हमी दिली, तर काही मास याची कार्यवाही झाली; मात्र आता यामध्ये खंड पडला असून आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
संपादकीय भूमिका :देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव झाल्यानंतरही राज्यातील काही शहरांची स्थिती अशी असणे, गंभीर आहे ! पाणीसमस्या लवकरात लवकर सोडवणे आवश्यक ! |