२५ वर्षे विविध चळवळींच्या माध्यमातून समाजाला जागृत करणारे ‘सनातन प्रभात’ ईश्‍वरनिर्मित असल्याने भावी काळातही ‘सनातन प्रभात’ची मशाल प्रज्वलितच राहील !

‘वर्ष १९९८ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) ‘साप्ताहिक सनातन प्रभात’ चालू केले. यंदा त्याला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. ‘त्या निमित्ताने आवश्यक ती सूत्रे लिहून घ्यावीत’, अशी मी श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांना प्रार्थना करते.

श्रीमती स्मिता नवलकर

१. ‘साप्ताहिक सनातन प्रभात’चा उद्देश

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी प्रामुख्याने समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि समाजामध्ये धर्मजागृती व्हावी, यांसाठी ‘साप्ताहिक सनातन प्रभात’ चालू केले. आरंभीच्या काळात ‘साप्ताहिक सनातन प्रभात’मध्ये अध्यात्मविषयक मार्गदर्शन, साधनेचे महत्त्व यांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यात नामजपाचे महत्त्व, नामजप कसा करावा ?, सत्संगाचे महत्त्व, सण आणि उत्सवांचे महत्त्व अन् ते कसे साजरे करावेत ?, त्यामागील शास्त्र इत्यादी विषयांवर मार्गदर्शन असायचे. त्याचप्रमाणे समाजाला अध्यात्माची आवड निर्माण होण्यासाठी आध्यात्मिक शब्दकोडी, मुले आणि महिला यांच्यासाठी धर्माचरण, सण-उत्सव धर्मशास्त्रानुसार कसे साजरे करावेत ?, इत्यादी विषयांवरील सदरे सादर करण्यात येत असत.

२. ‘साप्ताहिक सनातन प्रभात’चा परिणाम

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव स्वतः साप्ताहिक संपादित करत असल्याने त्यातील आध्यात्मिक लिखाणात पुष्कळ चैतन्य असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम समाजमनावर व्हायचा. त्यामुळे वितरण आणि वाचकसंख्याही वाढीस लागली. त्यामधील प्रबोधनपर विचारांचा परिणाम होऊ लागला. समाजामध्ये जागृती होऊ लागली. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतरच्या काळात अनेक वृत्तपत्रे प्रकाशित होत होती; परंतु ‘साप्ताहिक सनातन प्रभात’ने समाजाला धर्मशिक्षण देऊन, राष्ट्रप्रेम जागृत करून, समाजाला दिशादर्शन करून एक सामाजिक चळवळ उभी केली. त्याचप्रमाणे ही आध्यात्मिक पत्रकारिता कायद्याच्या चौकटीत राहून योग्य दृष्टीकोन देणारी असल्याने तिने समाजात जागृती घडवून आणली.

३. ‘साप्ताहिक सनातन प्रभात’च्या मागे ईश्‍वराचे पाठबळ आणि संतांचे आशीर्वाद असणे

हे सर्व सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या संकल्पाने होऊ शकले. एका आध्यात्मिक संस्थेने वृत्तपत्र चालवणे, ही साधी गोष्ट नाही. इतर वृत्तपत्रे कुठल्या ना कुठल्या सत्ताधार्‍यांची अथवा मोठ्या भांडवलदारांच्या मालकीची असतात. त्यामुळे त्यांना आर्थिक बळ सहजच मिळत असते; परंतु ‘सनातन प्रभात’च्या मागे केवळ ईश्‍वराचे पाठबळ आणि संतांचे आशीर्वाद आहेत, तरीही गेली २५ वर्षे ‘सनातन प्रभात’ची वाटचाल अव्याहत चालू आहे.

४. ‘साप्ताहिक सनातन प्रभात’ला आर्थिक हातभार लावण्यासाठी सनातन संस्थेच्या साधकांनी सेवा म्हणून विज्ञापने मिळवणे

‘साप्ताहिक सनातन प्रभात’ला आर्थिक हातभार लावण्यासाठी सनातन संस्थेच्या साधकांकडून सेवा म्हणून विज्ञापने मिळवण्यासाठी प्रयत्न चालू झाले. त्यासाठी विज्ञापनांची आस्थापने, अन्य मोठी आस्थापने, अधिकोष (बँक), उद्योजक आदींना भेटून विज्ञापने मिळवण्याचे प्रयत्न चालू झाले.

५. ‘साप्ताहिक सनातन प्रभात’साठी विज्ञापने मिळवतांना अडथळे येेणे

आरंभी काही लोक म्हणाले, ‘‘इतकी साप्ताहिके असतांना तुम्ही आणखी एक साप्ताहिक कशाला काढलेत ? तुमचे धर्म आणि अध्यात्म या विषयांवरील लिखाण असलेले हे साप्ताहिक कोण वाचणार ? अशी कितीतरी वर्तमानपत्रे बाजारात येतात आणि काही दिवसांत बंद पडतात. तुमचेही तसेच होणार..’’ त्या वेळी त्यांना प्रतिउत्तर दिले गेले, ‘‘आम्ही व्यवसाय म्हणून वर्तमानपत्र चालू केलेले नाही, तर राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती निर्माण करणे, अध्यात्मप्रसार करणे, समाजसाहाय्य करणे, या उद्देशाने ते चालू केलेले आहे.’’ त्या वेळी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक शासकिय मान्यता यादीत आणण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले गेले; परंतु काही विघातक शक्तींच्या विरोधामुळे ते अपयशी ठरले.

६. ‘सनातन प्रभात’ ईश्‍वर निर्मित असल्याने ते कधीही बंद पडणार नसणे

वर्ष १९९९ पासून ‘सनातन प्रभात’चे दैनिक चालू झाले. त्याच्या ४ आवृत्त्या चालू झाल्या (मुंबई-ठाणे-रायगड-विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, रत्नागिरी, गोवा-सिंधुदुर्ग), तसेच हिंदी आणि इंग्रजी भाषेत पाक्षिक अन् कन्नड भाषेतील साप्ताहिक चालू झाले. (गुजराती भाषेतील ‘मासिक सनातन प्रभात’ १९ वर्षे कार्यरत होते.) त्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘दैनिक सनातन प्रभात’च्या माध्यमातून चालू केलेल्या उपक्रमांना समाजाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुष्कळ हिंदुत्वनिष्ठ संघटना सनातनशी जोडल्या गेल्या आणि सनातनचे कार्य वाढले.

७. ‘सनातन प्रभात’चा उद्देश जगासमोर आल्यावर विरोध उणावत जाणे

जसे ‘सनातन प्रभात’चे धर्मकार्य वाढत गेले, तसा त्याला होणारा विरोध वाढत गेला; परंतु ‘सनातन प्रभात’चा उद्देश जगासमोर आला, तेव्हा विरोध उणावू लागला. ‘सनातन प्रभात’ ईश्‍वरनिर्मित असल्याने ते कधीही बंद पडणार नाही. ते अखंड चालूच रहाणार ! ‘साप्ताहिक सनातन प्रभात’ला २५ वर्षे पूर्ण होणे, ही त्याची प्रचीती आहे.

८. ‘साप्ताहिक सनातन प्रभात’ला ‘दैनिक सनातन प्रभात’ची सोबत

आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘साप्ताहिक सनातन प्रभात’लाही २५ वर्षे पूर्ण होऊन ते यंदा रौप्य महोत्सव साजरा करत आहे. ‘साप्ताहिक सनातन प्रभात’ सोबतच ‘दैनिक सनातन प्रभात’नेही आतापर्यंत स्वतंत्र भारतातील नागरिकांचे प्रबोधन केले आहे. त्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन केले आहे, तसेच जनजागृती, हिंदूसंघटन, मंदिर सरकारीकरण, देवतांचे विडंबन रोखणे, ‘लव्ह जिहाद’ विषयी जागृती, ‘लँड जिहाद’ विषयी जागृती, धर्मांतर रोखणे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे विचार इत्यादी विषय प्रज्वलीत केले आहेत. यामुळे भारतभरातील हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्वासाठी कार्य करणारे कार्यकर्ते यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळून प्रशासनालाही ‘सनातन प्रभात’च्या या विविध चळवळींची दखल घ्यावी लागली. भारताच्या स्वातंत्र्याची शतकपूर्ती होईल, त्या वेळीही ‘सनातन प्रभात’ची मशाल तेवतच रहाणार आहेे; कारण ‘सनातन प्रभात’ ईश्‍वरनिर्मित आहे.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी उभारलेल्या यज्ञकर्मात आम्हा साधकांना ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून सेवा अर्पण करण्याची संधी मिळत आहे. गुरुदेव याद्वारे कित्येक जिवांची साधना करवून घेत आहेत, तसेच त्यांच्या कृपेने ‘सनातन प्रभात’चा वाचक आणि समाज जागृत होऊन कृतीशील झाला आहे. तोही साधनेला लागला असून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सक्रिय झाला आहे. यासाठी मी त्यांच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘त्यांनी या सर्वांकडून पुढेही अशीच साधना करवून घ्यावी’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.’

– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.७.२०२३)