ज्ञानवापीची एक इंच भूमीही आम्ही देणार नाही ! – पू. (अधिवक्ता) हरीशंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन

प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता पिता-पुत्र जैन यांचा निर्धार !

डावीकडे अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि पू. (अधिवक्ता) हरीशंकर जैन

नवी देहली – मी स्पष्ट सांगू इच्छितो की, सनातन धर्मियांच्या काशीमधील भोलेनाथाची एक इंच भूमीही आम्ही देणार नाही. मुसलमान समाज (हिंदूंची) क्षमा मागून अनधिकृत नियंत्रण हटवेल, असे मात्र होऊ शकते, असे सडेतोड वक्तव्य पू. (अधिवक्ता) हरीशंकर जैन यांनी ‘एक्स’द्वारे ट्वीट करून केले.

त्यांच्या या वक्तव्याला दुजोरा देत त्यांचे पुत्र आणि ज्ञानवापी प्रकरणातील हिंदु पक्षाचे एक अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले, ‘‘ज्ञानवापी प्रकरणी न्यायालयाच्या बाहेर प्रकरण मिटवणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही.’’ ‘विश्‍व वैदिक सनातन संघा’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष जीतेंद्रसिंह बिसेन यांनी ज्ञानवापी प्रकरणातील मुसलमान पक्षाचे प्रतिनिधित्व करत असलेली ‘अंजुमन इंतेजामिया मशीद कमिटी’ला पत्र लिहून ज्ञानवापीचे प्रकरण न्यायालयाच्या बाहेर मिटवण्याचे आवाहन केल्यानंतर अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी त्यांची भूमिका मांडली.

सौजन्य न्यूज स्टेट 

अधिवक्ता विष्णु शंकर जैन पुढे म्हणाले की, आम्हाला या प्रकरणी कोणतीही तडजोड करायची नाही. असे करायचे झाले, तर दोन्ही पक्षांना त्यांच्या काही अधिकारांचा त्याग करावा लागेल. या प्रकरणात आम्हाला त्यांना (मुसलमान पक्षाला) एक इंच भूमीही द्यायची नाही ! मंदिराचा उपयोग मशीद म्हणून करण्यात आल्याने मुसलमान पक्षाने आमची क्षमा मागितली पाहिजे. त्यामुळे येथे तडजोडीचा प्रश्‍नच येत नाही.

सध्या वजूखाना (नमाजपठणाच्या आधी हात-पाय धुण्यासाठी असलेली जागा) सहित ज्ञानवापीच्या परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण केले जात आहे. भारतीय पुरातत्व विभागाला या संदर्भातील संपूर्ण अभ्यास वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या समोर २ सप्टेंबर या दिवशी ठेवावा लागणार आहे. त्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी चालू होईल.